धनंजय चंद्रात्रे यांची ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी बिनविरोध निवड
पुणे : ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी पुण्याचे श्री. धनंजय चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड झाली. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या असोसिएशनच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली. देशभरातील हजारो स्टेशन मास्टर या अधिवेशनात सहभागी झाले होते. चंद्रात्रे यांच्या निवडीमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते. देशातील सर्व विभाग आणि रेल्वे झोनमधील स्टेशन मास्टर या अधिवेशनात सहभागी होऊन नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करतात. सध्या देशभरात सुमारे ३४ हजार स्टेशन मास्टर कार्यरत असून, त्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी ही संघटना कार्यरत आहे. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्यांनी तब्बल १४ वर्षे संघटनेचे प्रमुखपद भूषविले होते.
रेल्वे गाड्यांची वाढती संख्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढलेला कामाचा ताण, मानसिक तणाव, कामाचे अनियमित स्वरूप आणि प्रशासकीय स्तरावरील विविध अडचणी अशा अनेक आव्हानांना स्टेशन मास्टरांना सामोरे जावे लागत आहे. आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांची भरती, कामाचा वाढता ताण, अधिकाऱ्यांकडून होणारी मनमानी आणि किरकोळ कारणांवरून बजावल्या जाणाऱ्या आरोपपत्रांचे प्रश्न यावर संघटनेला प्राधान्याने काम करावे लागणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून असोसिएशन स्टेशन मास्टरांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याबरोबरच विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी धनंजय चंद्रात्रे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील स्टेशन मास्टरांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
चंद्रात्रे यांच्या निवडीबद्दल देशभरातील विविध विभाग आणि झोनमधील पदाधिकारी व सदस्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुण्यात आगमन झाल्यानंतर ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे पुणे मंडळ सचिव दिनेश कांबळे आणि अध्यक्ष पुरुषोत्तम सिंग यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
