‘कविवरा विद्याधरा’ निमित्ताने रसिकांनी अनुभवला संगीत नाटकांचा सुवर्णकाळ
पुणे : प्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून कलाद्वयी संस्थेतर्फे ‘कविवरा विद्याधरा’ या अनोख्या कार्यक्रमात गोखले यांची नाट्यगीते व गद्यकाव्ये अतिशय प्रभावीपणे सादर करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्ताने रसिकांना संगीत नाटकांचा सुवर्णकाळ अनुभवायला मिळाला.
संगीत नाटके आणि नाट्यसंगीताची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी कलाद्वयी या संस्थेतर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्याच बरोबरीने संगीत नाटके नव्या कलाकारांसह पुन्हा मंचस्थ करण्याचे कार्यही करण्यात येते. नाविन्यपूर्ण उपक्रमांअंतर्गत ‘कविवरा विद्याधरा’ हा सादर करण्यात आला.
‘कविवरा विद्याधरा’ कार्यक्रमाची सुरुवात ‘शाबास बिरबल शाबास’ या नाटकातील ‘विश्वनाथ सूत्रधार तुच श्यामसुंदरा’ या नांदीने झाली. शिवशंकराच्या सगुण रुपाचे दर्शन घडविणारे ‘निराकार ॐकार’ हे पद सादर करण्यात आले. संगीत सुवर्णतुला नाटकातील ‘अंगणी पारिजात फुलला’ या पदाने नाट्यसंगीताची अविट गोडी रसिकांना अनुभवायला मिळाली. संजय गोसावी यांनी विद्याधर गोखले यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांच्या लिखाणाची खासियत अशा आठवणी जागवत गोखले यांची शीघ्रकाव्याची प्रतिभा उलगडून दाखताना मधुवंती दांडेकर यांच्यावर गोखले यांनी रचलले ‘सप्तसूरांचे वसंत वैभव घेऊन ही गुणवंती रसिक दिलाला करील घायाळ मधुरा मधुवंती’ हे शिघ्रकाव्य प्रभावीपणे ऐकवले. ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘कोपलास का’, ‘धीर धरी जागृत गिरीधारी’, तसेच अनुस्वाराच्या अनुप्रासाचे सौंदर्य दाखविणारे संगीत मदनाची मंजिरी या नाटकातील ‘अंग अंग तव अनंग’, पंडितराज जगन्नाथ नाटकातील ‘नयन तुझे जादूगार’ ही पदे रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. तर नृत्याचे गाणे असे वैशिष्ट्य असलेल जय जय गौरिशंकर या नाटकातील भिल्लीण रुपातील पार्वतीच्या तोंडी असलेले ‘सावज माझं गवसलं’ हे पद रसिकांच्या आग्रहाखातर पुन्हा सादर करण्यात आले. संगीत रूपमती नाटकातील कबिराच्या दोह्याप्रमाणे रचना असलेले ‘काहे को करत गुमान’ हे पद रसिकांना विशेषत्वाने भावले. संगीत बावनखणी नाटकातील ‘प्रितीचा कल्पतरू जो मला’ हे पद सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करताना ‘प्रेमरंगामध्ये रंगली होलिका’ या पदाने सर्व रसिक प्रेमरंगाच्या सुरांमध्ये न्हाऊन निघाले.
विद्याधर गोखले यांची स्वभाव वैशिष्ट्ये आणि प्रतिभा उलगडून दाखवत अनेक नाटकातील गद्यकाव्ये संजय गोसावी यांनी सादर केली तर कार्यक्रमाचे निवेदन वर्षा जोगळेकर यांनी केले.
गायनाची बाजू युवा पिढीतील कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे गायक-अभिनेते चिन्मय जोगळेकर आणि गायिका-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांनी सांभाळली. विद्यानंद देशपांडे (तबला) आणि संजय गोगटे (ऑर्गन) यांनी समर्पक साथ दिली.
सुरुवातीस ज्येष्ठ गायिका अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांचा अमृत महोत्सवानिमित्ताने ज्येष्ठ निरुपणकार, संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती समितीवर निवड झाल्याबद्दल नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष दीपक रेगे यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
