रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : महिला नवउद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भरवण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या कोथरूड शॉपिंग फेस्टला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उन्हाची तीव्रता असतानाही कोथरूडकरांनी महिला नव उद्योजिकांना प्रोत्साहन दिले.
सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ भरवण्यात आले होते. रोटरियन डॉ. ऋचा वझे – मोकाशी यांच्या संकल्पनेतून या ‘कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २’ भरवण्यात आले. यामध्ये रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी, सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याविषयी माहिती देताना डॉ. ऋचा वझे – मोकाशी म्हणाल्या, महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या शॉपिंग फेस्ट मध्ये १०० हून अधिक महिला नव उद्योजिकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी आणि कोथरूडवासीयांनी प्रतिसाद देत हा फेस्ट यशस्वी केला.
दरम्यान, कोथरूड शॉपिंग फेस्ट मध्ये अभिनेत्री विभावारी देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या, महिला उद्योजकांवर आधारीत ‘बटरफ्लाय’ या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात आले. याशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या.
