fbpx
Tuesday, May 14, 2024
Latest NewsPUNE

‘मोपल्यांचे बंड ते द केरला स्टोरी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – हर घर सावरकर समिती तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बालगंधर्व रंगमंदिर येथे “मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकरप्रेमींच्या उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसादात कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते अविनाश धर्माधिकारी, शेफाली वैद्य आणि अक्षय जोग तसेच श्रीपाद अवधूत स्वामी, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दादा वेदक या मान्यवरांसह आयोजक हर घर सावरकर समितीचे देवव्रत बापट, अनिल गानू आणि सूर्यकांत पाठक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कलासक्त संस्थेच्या कलाकारांनी सावरकर यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व जयोस्तुते या गाण्यावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला. देवव्रत बापट यांनी ‘हर घर सावरकर’ या अभियान व त्यामागचे विचार याविषयी माहिती दिली. यानंतर मोहोळ येथील श्रीमंत बाजीराव पेशवे सैनिकी शाळेचे संस्थापक आबा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना “हिंदू धर्माच्या सर्व भाषेत असलेल्या प्रार्थना या सर्व विश्वाचे कल्याण व्हावे हा विचार मांडतात त्यामुळे हिंदू विचार हा खऱ्या अर्थाने मानवतावादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या हिंदू विचाराला विज्ञानाची भीती नाही, उलट विज्ञान जेवढे पुढे जाईल तेवढे ते भारताची अध्यात्म निष्ठता सिद्ध करेल. त्यामुळे मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात हिंदू प्रतिभेने वर्चस्व प्रस्थापित करणे हीच खरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली ठरेल. हिंदू विचारांनी माणूस आणि निसर्ग एकच मानले म्हणूनच विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करता आली. हा विज्ञाननिष्ठ विचार सर्वांपर्यंत नेला पाहिजे तर हर घर सावरकर अभियान यशस्वी होईल.” असे मत अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले.
द केरला स्टोरी लोकांना का भावते याचा विचार करायला हवा, असे मत वैद्य यांनी मांडले. त्या म्हणाल्या, ‘केवळ केरळमध्ये नाही तर आपल्याही आजूबाजूला अशा घटना घडत असून, आपण ते डोळे उघडून बघायला हवे. धर्म पाळायचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यावर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही, असे असताना विस्तारवादी धर्मांतरण का केले जाते? याचा विचार समाजाने करायला हवा.’
“मोपल्यांचे बंड” याची माहिती देतानाच सावरकर हे अहिंदू द्वेष्टे नव्हते पण हिंदूंना त्यांचे नागरी, सामाजिक अधिकार आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी हिंदू संघटना स्थापन केली, असा विचार जोग यांनी मांडला. मानवतेकडे जाणारे एक पाऊल म्हणजे हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद असल्याचेही जोग यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर प्रियांका पुजारी यांनी आभार प्रदर्शन केले व “वंदे मातरम” गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading