fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsPUNE

‘तू सूर्याचे तेज’ या विशेष कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनोखी मानवंदना

जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात सकाळी ९.३० ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन, प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिभावंत कलाकारांच्या सादरीकरणातून सावरकरांचे विचार, त्यांचा त्याग, त्यांचे जीवन आणि त्यांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने येत्या रविवार दि. २८ मे, २०२३ रोजी सकाळी ९.३० ते रात्री १० वाजेपर्यंत कर्वे नगर येथील नवसह्याद्री सोसायटी जवळील पंडित फार्म्स येथे ‘तू सूर्याचे तेज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून अजय धोंगडे हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. तर सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी हे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी ९.३० वाजता प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांचा ‘सावरकरांची अंदमानातील कविता’ हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये त्या सावरकरांच्या कविता सादर करतील. यानंतर दुपारी १२ वाजता ‘त्या तिघी’ या कादंबरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश प्रस्तुत होईल. यामध्ये आपल्या पतीच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणाऱ्या सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर, शांताबाई नारायण सावरकर या तीन वीरांगनांची शौर्यकथा एकपात्री नाट्यप्रवेशाच्या माध्यमातून सादर केली जाईल. सदर एकपात्री नाट्यप्रवेशाची संकल्पना, संहिता लेखन, दिग्दर्शन व सादरीकरण हे अपर्णा चोथे यांचे आहे.

यानंतर सायं ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण ‘सागरा प्राण तळमळला’ या कार्यक्रमाद्वारे संपन्न होईल. कलासक्त, कलावर्धिनी, निलिमा प्रोडक्शन आणि कलानुभूती या नृत्य संस्था यावेळी कवितांचे नृत्य सादरीकरण करणार असून स्नेहल दामले या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. कथक व भरतनाट्यम अशा दोन नृत्यशैलींमध्ये कवितांचे सादारीकरण होणार आहे. या कार्यक्रमानंतर सायं ५.४५ वाजता युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर हे ‘सावरकरांची लंडन वारी’ हा कार्यक्रम प्रस्तुत करतील.

सायं ७.३० वाजता ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ या सांगीतिक कार्यक्रमातून सावरकरांच्या कविता, गाणी आणि अभ्यासपूर्ण निवेदन यातून सावरकरांचे चरित्र उलगडण्याचा प्रयत्न करणारा कार्यक्रम सादर होईल. सदर कार्यक्रमाची संकल्पना ही अनघा मोडक यांची असून यामध्ये धनंजय म्हसकर, शरयू दाते, नचिकेत देसाई, केतकी भावे जोशी हे गायन करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन व संवादिनी यांची जबाबदारी निरंजन लेले यांची असणार असून प्रशांत लळीत (संगीत संयोजन व कि बोर्ड), ओंकार देवसकर (कि बोर्ड), निषाद करलगिकर (तबला), हनुमंत रावडे (पखावज, ढोलक), दिगंबर मानकर (तालवाद्य, ऑक्टोपॅड) आदी साथसंगत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading