fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत एका दिवसात ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात

पुणे – राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली असून एकाच दिवशी ८ तालुक्यातील ११ कामे हाती घेण्यात आली.

शनिवारी पुरंदर तालुक्यातील नावळी तोरवे वस्ती या पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल नावळी गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्ह्यात एकाच दिवसात पुरंदर तालुक्यात नावळी, वेल्हा तालुक्यात गुंजवणे, शिरूर तालुक्यात मोऱ्याची चिंचोळी, बारामती तालुक्यात बाबूडी, इंदापूर तालुक्यात मदनवाडी, खेड तालुक्यात जरेवडी, रासे, तसेच जुन्नर तालुक्यात आणे पोडगा व आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर अशा ११ ठिकाणी एकाच दिवसात कामे सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागांतर्गत १ हजार १६ पाझर तलावांची यादी तालुकस्तरीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी ३७ कामांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ही कामे लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात प्रत्येक तालुक्यातून १० कामे सुरू करण्यात येणार आहेत.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानामुळे धरण व तलावातील गाळ उपसून शेतात पसरविल्यास कृषि उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची व तलावाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. तलावातील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकावयाचा असल्यास संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. या योजनेसाठी इंधन व यंत्रसामुग्रीसाठी लागणारा प्रति घनमीटर रु. ३१ एवढा खर्च राज्य शासन देणार आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सीमांत, अत्यअल्पभूधारक ( १ हेक्टर पर्यंत) व लहान (१ ते २ हेक्टर) शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये याप्रमाणे अडीच एकर क्षेत्रासाठी ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी- येत्या काळातील संभाव्य पाणी संकटावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी आपल्या परिसरातील पाणीसाठ्यातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवणे त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे व पाण्याचा अपव्य टाळून योग्य वाटप करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. जलसाठ्यातून निघालेला गाळ आपल्या शेतात टाकून शेताची सुपीकता वाढवावी यासाठी अधिकाधिक शेतकाऱ्यांनी अभियानात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच अशासकीय संस्थानी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा हेतू साध्य करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा.

Leave a Reply

%d bloggers like this: