चित्रकथी आर्ट गॅलरीमध्ये ‘कलर्स ऑफ लाईफ’ प्रदर्शनाचे आयोजन
चित्रकार:- विठ्ठल हिरे, प्रदिप सरकार, आशिफ होसेन, दीपक पाटील आणि पारस परमार
मुंबई येथील चित्रकथी आर्ट गॅलरी, ४०२, आकृती ओरियन बिल्डिंग, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे दि ८ मे ते ७ जून २०२३ दरम्यान ‘कलर्स ऑफ लाईफ’ या सुप्रसिद्ध पाच चित्रकारांच्या समूह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या समूह प्रदर्शनात सुप्रसिध्द चित्रकार :- विठ्ठल हिरे, प्रदिप सरकार, आशिफ होसेन, दीपक पाटील आणि पारस परमार यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनाचे संयोजन वास्तू विशारद आणि जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या माजी विद्यार्थिनी अनुराधा रायकर यांनी केले आहे. अनुराधा रायकर या चित्रकथी आर्ट गॅलरीच्या संचालिका आहेत. अनुराधा रायकर यांनी अनेक वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम केल्यानंतर चित्रकारांची या गॅलरीच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ तयार केले आहे. चित्रकथी आर्ट गॅलरी ही चित्रकार, कला रसिक आणि कला संग्राहक यांना जोडणारे एक उत्तम माध्यम ठरेल यात शंका नाही.
जलरंग या अवघड माध्यमांवरील विलक्षण पकड हे विठ्ठल हिरे यांचे वैशिष्टय आहे. ग्रामीण आणि नागरी जीवनातील विषयांचं चित्रण हिरे यांनी आकर्षक पद्धतीने केले आहे.
प्रदीप सरकार यांनी आपल्या चित्रांमध्ये कलेचे पावित्र्य आणि संगीताच्या माध्यमातून साधता येणारे अध्यात्मिक समाधान कॅनव्हासवर चित्रित केले आहे. विविध कला या मानवी जीवनाला अर्थ मिळवून देतात. या अर्थाचा शोध प्रदीप सरकार यांनी चित्रांच्या माध्यमातून घेतला आहे.
आसिफ होसेन यांनी प्रामुख्याने ऍक्रॅलिक माध्यमात काम केले आहे. त्यांची चित्रे ही बनारसच्या काठावरील मंदिरांचं पावित्र्य कॅनव्हासवर चित्रित करतात. एखाद्या सुंदर कथेप्रमाणे बारीक तपशिलांसह मंदिर आणि आजूबाजूच्या घटकांचे मोहक चित्रण आशिफ करतात.
दीपक पाटील यांची चित्र माध्यमावर हुकूमत असल्याने एकाच वेळी तेजस्वी आणि मंद रंगांची मोहक जुगलबंदी त्यांनी कॅनव्हासवर साकारली आहे. सोबतच वाळूसारख्या वेगळ्याच माध्यमाचा वापर करून राजस्थानी मन्युष्यजीवन त्यांनी कॅनव्हासवर चित्रित केले आहे.
मनातील भावनांचे अमूर्त चित्रण तेजस्वी रंगांच्या साहाय्याने पारस परमार यांनी कॅनव्हासवर केले आहे. रंगांचा योग्य वापर आणि चित्रकलेच्या तंत्रावरची हुकूमत हे पारस यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. विले पार्ल्याच्या
‘चित्रकथी आर्ट गॅलरी’मध्ये हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येईल. चित्र तंत्रावर अदभूत हुकूमत असलेल्या पाच चित्रकारांचे हे प्रदर्शन कला रसिकांना पर्वणीच आहे.
