चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा सत्यशोधक बहुजन आघाडीचा इशारा
पुणे : मांजरी बुद्रुक येथील दलित समाजातील शिवाजी तुपे आणि त्यांच्या कुटुंबियावर बिल्डरकडुन सातत्याने अत्याचार,खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले असुन या विरोधात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीने दिला आहे.
शिवाजी तुपे आणि त्यांच्या कुटुंबीयांची मांजरी बुद्रुक परिसरात 12 गुंठे जमीन आहे. ती स्वप्निल सिसोदीया व त्यांच्या सहकाऱ्यांना विकसीत करण्यासाठी १८ महिन्याची मुदत दिली होती. परंतु १० वर्षे झाली तरी त्यांच्याकडून सदरील प्लॉट विकसीत केला गेला नाही. त्यामुळे तेथे प्लॉटवर तुपे यांनी छोटीशी दुकाने सुरू केली. याबाबत सदरील विकसकांनी तुपे परिवाराला व सदरील जागेतील दुकान व्यावसायिकांना स्वप्निल सिसोदीया व त्यांच्या सहकाऱ्यांकडून काही गुंड व्यक्तींच्या मार्फत धमकाविण्याचा प्रकार सातत्याने करण्यात येत आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी तुपे कुटुंबीय हडपसर पोलीस स्टेशन येथे वारंवार जात आहेत. परंतु सदर पोलीस स्टेशन मधून कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही. तरी सदर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी तुपे यांनी केली.
