नृत्योपासनेतून उलगडले जीवनाचे सूत्र
पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिर प्रवेशास ११४ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवामध्ये पुणे प्रार्थना समाज आणि समर्चना स्कूल ऑफ डान्स यांच्यावतीने नृत्योपासना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या खुल्या रंगमंचावर कार्यक्रम सादर झाला. पुणे प्रार्थना समाजाचे सचिव डॉ. दिलीप जोग, व ज्येष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते.
‘ ह्रदय धाव रसभरे ‘या डाॅ.भांडारकर यांच्या नमनावरील नृत्याच्या सादरीकरणाने कलाकारांनी नृत्योपासना या कार्यक्रमाची सुरुवात केली. संत बलिराम यांच्या ‘जाग जाग मन ना नींद करिये’, ‘जो जागा सो अमृत चाखा, जो सोया तू खोया रे’ या दोह्याच्या माध्यमातून कलाकारांनी जीवनाचे एक प्रकारे सूत्र मांडले.
समर्चना स्कूल ऑफ डान्सच्या कलाकारांनी कुचीपुडी, भरतनाट्यम आणि कथक या नृत्यशैलींच्या माध्यमातून अप्रतिम सादरीकरण केले. रंगमंचाची सुरेख संरचना, त्यावर कलाकार सादर करीत असलेल्या कथेला साजेशी प्रकाशयोजना, प्रकाश योजनेतून निर्माण होणारे विविध प्रसंग आणि सोबत सुमधुर दाक्षिणात्य संगीत अशा नृत्य संगीत यांच्या अप्रतिम संगमातून कार्यक्रमात कलाकारांनी रंगत आणली.
डॉ. दिलीप जोग म्हणाले, पुणे प्रार्थना समाजाच्या चैत्रोत्सवाच्या निमित्ताने नृत्याच्या माध्यमातून ईश्वर उपासना सादर करत आहोत. नमिता मुजुमदार यांचे निवेदन , संहिता व नृत्य, अंजली राजूआणि आभा औटी यांचे नृत्य व इतर कलाकारांचा सहभाग प्रेक्षकांना आध्यात्मिक पातळीवर घेऊन गेला.
