Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

संगीताचा गाभा सांभाळत आधुनिकतेची कास धरणे काळाची गरज – आनंद भाटे

पुणेः- संगीत ही उच्चकोटीची साधना असते. या साधनेला नवतेची जोड देणे आवश्यक असते. आज पुरस्कार देण्यात आलेले पुरस्कारर्थी हे पंरपरेची कास न सोडता नवतेची भर घालणारे नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. संगीताचा गाभा सांभाळत आधुनिकतेची कास धरणे काळाची गरज असते, असे मत प्रसिध्द ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांनी व्यक्त केले. 
गांधर्व महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक विनय चित्राव यांच्या नावाने देण्यात येणारा दुसरा ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’  सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे आणि प्रसिध्द हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी यांना आज चित्राव यांच्या व्दितीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रसिध्द ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकी रूपये  ११,०००, शाल, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने, गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे, वीरेंद्र चित्राव आणि विभव चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना आनंद भाटे म्हणाले की, निरपेक्षवृत्तीने काम करणारे व्यक्तीमत्व अशी विनय चित्राव यांची ख्याती होती. माझ्या बहुतेक सर्व मैफलींना तंबोऱ्याची साथसंगत करण्यापासून ते तंबोरे कार्यक्रमस्थळापासून ते घरापर्यंत विनाक्षती पोहोचविण्याची जबाबदारी विनय चित्राव घेत असत. 
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, विनय चित्राव यांचे आयुष्य म्हणजे 80 टक्के संगीत आणि 20 टक्के समाजजीवन असे होते. समाजसेवा आणि संघटन हे त्यांच्या जीवनाचे व्रत होते. खऱ्या अर्थाने त्यांनी विनय हे त्यांचे नाव सार्थकी केले. सेवा, संगीत आणि समर्पण ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची त्रिसूत्री होती. 
यावेळी बोलताना सावनी शेंडे म्हणाल्या की, विनय चित्राव हे माझ्यासाठी एक आश्वस्त व्यक्तीमत्व होते. कलाकारांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा हक्काचा माणूस होता. एका साधकाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार असून विनय़ चित्राव यांनी घालून दिलेल्या माणुसकीच्या वाटेवर चालण्यासाठी प्रेरीत करणारा आणि दीपस्तंभासम भासणारा हा पुरस्कार मला आगामी काळात मार्गदर्शकाची भूमिका निभावेल. 
यावेळी बोलताना मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, गेल्या 22 वर्षांपासूनचा आमचा मैत्रभाव होता. गांधर्व महाविद्यालयात गुरूकुल पद्धतीने शिकायला आल्यानंतर आचार्य पं. प्रमोद मराठे यांच्याविषयी आदरयुक्त भिती होती. त्या प्रसंगी विनयशी कोणताही भिडस्तपणा न बाळगता संवाद साधता यायचा. 
यावेळी प्रमोद मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र चित्राव यांनी केले. भाग्यश्री देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले. देवयानी चित्राव यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सावनी शेंडे आणि मिलिंद कुलकर्णी यांची विशेष सुश्राव्य मैफल झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading