Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवारांचे ऐकतो, अजितदादांचे नाही – खासदार संजय राऊत

मुंबई: मी लिहलेलं सत्य कोणाला बोचत असेल तर त्याला मी काय करू. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. खरं बोलल्यामुळे कोणी मला लक्ष्य करत असेल तरी मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलत आणि लिहीत राहणार. माझ्या विश्वसनीयतेवर शंका उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. फक्त शरद पवार यांनी माझ्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित केली तर मी त्याची दखल घेईन. मी फक्त शरद पवार यांचेच ऐकेन, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. 

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असून त्याअंतर्गत भाजपकडून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा दावा काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केला होता. मात्र, अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे फटकारले होते. इतर कोणीही आमच्या पक्षाची वकिली करू नये. आमच्या पक्षाबाबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सक्षम आहेत, असा टोला अजितदादांनी राऊत यांनी लगावला होता. त्या टीकेला संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.

मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. मी मविआची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडता? महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष मजबूत राहावा, त्याचे लचकडे तोडले जाऊ नयेत, हीच माझी भूमिका आहे. जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा तुम्हीही आमची वकिली केली होती. मी खरं बोललो म्हणून कोणी मला लक्ष्य करत असेल तरी मी मागे हटणार नाही, खरं बोलत राहीन, असे सांगत संजय राऊत यांनी एकप्रकारे अजित पवार यांना प्रतिआव्हान दिले आहे. मी ऑपरेशन लोटसबाबत बोललो याचा राग भाजपला आला पाहिजे. इतर कोणालाही राग यायला नको. भाजपकडून मविआत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत किंवा नाही,याचे उत्तर अजित पवार यांनी द्यावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading