अयोध्या येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार
अयोध्या : येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत #महाराष्ट्रभवन उभारणार असल्याची माहिती दिली.यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकारात्मक भूमिका असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या घेतलेल्या निणर्यांची माहिती देतानाच राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अयोध्येतील वातावरण भारावलेले असून राम मंदिराच्या गर्भ गृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी २०२४ मध्ये मंदिरांचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुर्ण होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आज सकाळी मुख्यमंत्री . शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत-महंतांची भेट घेतली. मंदिर बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. याप्रसंगी राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
