Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

मूर्तीशास्त्राबाबत समाजात प्रचंड अनास्था – डॉ.गो.बं. देगलूरकर

पुणे : आपल्या मनातील कार्य सिद्धीस जाण्यासाठी माणूस विविध प्रकारच्या मूर्तींची पूजा करतो, परंतु अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष ज्या मूर्तीची पूजा करतात त्या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत, त्याचे स्वरूप काय आहे, याबद्दल सुद्धा माहिती नसते. समाजामध्ये मूर्ती शास्त्राबद्दल प्रचंड अनास्था आहे. आपण ज्या गुणप्राप्तीसाठी देवाची पूजा करतो, त्या देवाच्या मूर्तीची तरी माहिती आपण घेणे आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ मूर्ती शास्त्रज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जंगली महाराज मंदिर उत्सवामध्ये सगुणाचे द्वारे निर्गुण पाविजे या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.
डॉ.गो.बं. देगलूरकर म्हणाले, जगात ३३ कोटी देव नाहीत तर ३३ प्रकारचे देव आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि त्या प्रकारचे गुण प्राप्त करण्यासाठी मूर्तीला घडवत असतो आणि त्या मूर्तीची पूजा करतो. पूर्वी निर्गुण निराकार असणाऱ्या पंचमहाभूतांची पूजा केली जात असे, त्यानंतर त्या निर्गुण निराकाराचे रूपांतर सगुण रूपामध्ये झाले आणि विविध प्रकारच्या देवांच्या मूर्ती घडल्या.
मूर्ती पूजा करण्यामागे तत्त्वज्ञान आहे. मूर्तिपूजा करणे म्हणजे बुरसटलेले विचार आहेत असे मानणे चुकीचे आहे. सनातन नित्यनूतन या विचारांप्रमाणे समाजामध्ये नित्य नवीन बदल होत राहतात आणि त्याचेच प्रतिबिंब मूर्तीमध्ये आणि माणसाच्या विचारांमध्ये पडते. त्यातूनच माणूस मूर्ती पूजेकडे वळला. हिंदू धर्माचा विचार पुढील पिढीकडे कार्यान्वित व्हावा यासाठी मूर्ती पूजा केली पाहिजे. मूर्ती पूजा करण्यापूर्वी त्या मूर्तीचा अभ्यास मात्र करणे गरजेचे आहे. त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन डोळे मिटून राहण्यापेक्षा उघड्या डोळ्याने मूर्तीकडे पहा. मूर्तीचा अभ्यास करा आणि त्यातील भाव समजून घ्या, अशी असे आवाहन यावेळी डॉ.गो.बं. देगलूरकर यांनी केले.
*प्रभू श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती*
अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्यात येत आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती आहे. कारण हे रामलल्लाचे मंदिर आहे .या मूर्तीच्या हातामध्ये धनुष्य आहे. परंतु पाठीवर बाणाचा भाता नाही. कारण भाता हा केवळ शिकारीला जातानाच वापरला जातो. काही महिन्यांपूर्वी मी अयोध्या मध्ये गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना प्रभू श्रीरामाची अगदी लहान वयातील मूर्ती मंदिरामध्ये असू नये अशी सूचना केली. कारण प्रभू श्रीरामाची लहान वयातील मूर्ती श्रीकृष्ण प्रमाणे वाटेल अशी सूचना मी त्यांना केली. त्या सूचनेप्रमाणे आता मूर्ती घडविण्यात येत आहे, असेही यावेळी डॉ. देगलूरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading