उद्योगमंत्री उदय सामंत व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या बोटीला अपघात
रायगड : शिवसेना शिंदे गटाचे आमदार व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आपघाता वेळी उदय सामंत यांच्या बरोबर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) हे देखील होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नसून सर्वजण सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज अलिबागचा नियोजित दौरा होता. तर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीसाठी ही दोन्ही बडे नेते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून स्पीड बोटीने निघाले होते. बोट मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर बोट चालक कॅप्टनने बोट वळवली. पण याचवेळी कॅप्टनचा बोटीवरील ताबा सुटला आणि बोट जेटीच्या खालच्या पिलरला जाऊन धडकली. सुदैवाने यावेळी बोटीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
