कर्नाटक विधानसभा निवडणुक तारखा जाहीर
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.
कर्नाटकात २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा मतदान करणारांची संख्या ९.१७ लाखांनी वाढली आहे. १ एप्रिलपर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कर्नाटक राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघांत ५,२१,७३,५७९ नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात ५८,२८२ मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२३
उमेदवारी अर्ज छाननी तारीख – २१ एप्रिल २०२३
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख – २४ एप्रिल २०२३
मतदानाची तारीख -१० मे २०२३
मतमोजणीची तारीख – १३ मे २०२३
कर्नाटक विधानसभा २४ मे रोजी विसर्जित होणार
दरम्यान २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २७ मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच २९ मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे.
