fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

‘मिशन समर्थ’ अंतर्गत महानिर्मितीच्या जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे ‘मिशन समर्थ’ अंतर्गत आयोजित जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांच्या हस्ते करण्यात आले. बायोमासचा उपयोग करतांना बाष्पकाच्या रचनेनुसार ज्वलन क्षमतेत वाढ करण्यावर आणि जैव इंधनाची गुणवत्ता व घनता यावर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे, असे डॉ.अनबलगन यावेळी म्हणाले.

हॉटेल नोवोटेल येथे आयोजित या कार्यशाळेला महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप, मिशन समर्थचे संचालक सुदीप नाग, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, दिवाकर गोखले, अभय हरणे, कार्यकारी संचालक राजेश पाटील, डॉ.नितीन वाघ, नितीन चांदूरकर, राजेशकुमार ओसवाल, अंकुश नाळे, पंकज नागदेवते, प्रफुल्लचंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.

डॉ.पी.अनबलगन म्हणाले, महाराष्ट्राचे सर्वच क्षेत्रात लक्षणीय योगदान आहे. बायोमास पेलेटच्या वापराच्या क्षेत्रातही राज्यात मोठी संधी आहे. बाष्पकासाठी कोळशाचा तुटवडा आणि विद्युत ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता बायोमासचा उपयोग महत्वाचा आहे. जैव इंधनाचा वापर करणे व पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भारत सरकार विद्युत मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘मिशन समर्थ’ अंतर्गत औष्णिक वीज केंद्रात कोळश्यासोबत किमान ५ टक्के इतक्या प्रमाणात बायोमास पेलेट इंधनाचा मिश्रित वापर करण्याचे निर्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रास बायोमास इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन त्यासाठी शेतकरी, लघु व मध्यम उद्योजक यांची एक दीर्घकालीन पुरवठा साखळी व्यवस्था स्थानिक पातळीवर तयार होऊन त्यायोगे कृषी व लघु–मध्यम उद्योग क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी असा प्रयत्न केला जाणार आहे.

महासंचालक रवींद्र जगताप म्हणाले, शेतकऱ्याच्या हिताचा हा विषय असल्याने त्याचा क्षेत्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. पेलेट उत्पादनात शेतकऱ्यांनी पुढे यावे यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे. महाराष्ट्रात २०३० पर्यंत ३५ ते ४० हजार मेगावाट विजेची मागणी राहू शकते, त्यापैकी ३० टक्के नाविनीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल. प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर भेट देऊन वास्तव परिस्थिती जाणून घ्यावी लागेल. स्थानिक स्तरावरील लहान प्रयोगांना प्रोत्साहित करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

मिशन समर्थचे संचालक सुदीप नाग म्हणाले की, शेतीत जैव इंधन जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पीक काढल्यानंतर शेत पुन्हा तयार करण्याची ही स्वस्त आणि सुलभ पद्धत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी जुलै २०२१ मध्ये ‘मिशन समर्थ’ सुरू करण्यात आले. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे हे या मिशनचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. बायोमासच्या उपयोगाने आत्ताच्या पायाभूत सुविधेच्या साहाय्याने वीजनिर्मिती करणे शक्य आहे. मिशनच्या माध्यमातून पेलेट उत्पादकांना त्याच्या उपयोगाची शाश्वती देण्यात येऊन प्रोत्साहनही देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी सहकाराच्या माध्यमातून बायोमास एकत्रित करणे आणि पेलेट तयार करून उत्पन्न वाढवावे. महाराष्ट्रात ८२ दशलक्ष मे.टन कृषी उत्पादन होते. त्यापैकी ५२ दशलक्ष मे.टन बायोमास उपलब्ध होते. घरगुती व इतर उपयोग वजा जाता २१ दशलक्ष मे.टन बायोमास पेलेट उत्पादनासाठी उपयोगात आणणे शक्य आहे. उद्योजक आणि शेतकऱ्यांनी याबाबत विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक संजय मारुडकर यांनी केले. जैव इंधनाशी संबंधित सर्व घटकांना एकत्रित आणून बायोमास पेलेट इंधनाचा वापर वीजनिर्मितीत करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणासाठी महानिर्मितीतर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

जैव इंधन क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान, संधी, आव्हाने, संशोधन, बाजारपेठ विश्लेषण आणि कर्ज उपलब्धतेवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जैव इंधन विषयाशी संबंधित माहिती देणारे विविध स्टॉल्स देखील प्रदर्शित करण्यात आले. कार्यशाळेला शेतकरी, पेलेट उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, लघु/मध्यम उद्योजक प्रतिनिधी, महानिर्मितीचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading