fbpx

सुर तालाच्या मिलापाने रंगला ‘स्वरभारती’

पुणे : शास्त्रीय संगीताच्या रागदारीचे सुरमय दर्शन ,सुगम संगीताचे अप्रतिम सादरीकरण आणि सोबतीला मंत्रमुग्ध करणारे ताल वादन अशा सुर,ताल आणि स्वरांच्या अविट मिलापाने स्वरभारती कार्यक्रम रंगला.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने ‘स्वरभारती’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करीत रसिकांना अप्रतिम कलेची अनुभूती दिली.

निनाद दैठणकर यांच्या संतूर वादनाने मैफिलीची सुरुवात झाली. राग हंसध्वनी त्यांनी संतूर वादन करून विविध रचना सादर केल्या. ऋषिकेश जगताप यांनी त्यांना तबल्यावर साथसंगत केली.

नागेश आडगावकर यांची शास्त्रीय मैफिल रंगली. त्यांनी ‘हे तुमको गुणी गुणी निहारे ही बंदीश राग श्री मधून सादर केली. त्यानंतर त्यांनी राग यमन सादर केला. सुरंजन खंडाळकर, उज्वल गजभार, यांनी गझल, नाट्यसंगीत, सुगम संगीत, मराठी गवळण, गोंधळ असे विविध प्रकार सादर करुन रसिकांची मने जिंकली. स्वानंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर त्यांना साथ दिली. ओंकार उजागरे, अमोल बेलसरे, डाॅ. राजेंद्र दूरकर आणि शुभम उगळे यांनी साथसंगत केली.

संगीत क्षेत्रात भरीव योगदानासाठी ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पं. विकास कशाळकर, पं. राजेंद्र कुलकर्णी, पं. राजेंद्र कंदलगावकर, पं. रामदास पळसुले, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख पं. शारंगधर साठे, पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप, भरत नाट्यमंदिरचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्यवाह संजय डोळे, शुभांगी बहुलीकर, शिरीष कौलगुड आदी यावेळी उपस्थित होते.

पं. शारंगधर साठे म्हणाले, भारती विद्यापीठच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कलाक्षेत्रातील अनेक कलाकार तयार झाले आहेत. हे कलाकार केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशातही कलेची सेवा करत आहेत. या कलाकारांच्या माध्यमातूनच संस्थेचे नाव अधिकाधिक मोठे होत आहे आणि त्यातून संगीताची परंपरा जपली जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: