तरुण पिढीने समाजसेवेचा वसा हाती घेतला पाहिजे – डॉ. के. एच संचेती
पुणे : प्राणी हे केवळ स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जगतात, परंतु मनुष्य प्राण्याने उदरनिर्वाहाच्या पलीकडे समाजाचाही विचार केला पाहिजे. आपल्याकडे किती बँक बॅलन्स आहे, सोने किती आहे याचा विचार समाज करत नाही, परंतु आपण जगातून गेल्यानंतर या व्यक्तीने समाजासाठी किती चांगले काम केले, याचा विचार केला जातो त्यामुळेच तरुण पिढीने केवळ पैशाच्या मागे न लागता समाजसेवेचा वसा हाती घेतला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांनी केले.
स्नेहालय अहमदनगर संचलित स्नेहाधार प्रकल्प पुणे यांच्यातर्फे सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी राजश्री पाटील आणि नंदिनी जाधव यांना डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते स्नेहाधार गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहाधारचे ज्येष्ठ कार्यकर्ते डाॅ. प्रकाश शेठ, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे कृष्णा राजाराम अष्टेकर, संचालिका प्रीती गोडबोले आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ.के.एच. संचेती म्हणाले ,प्रामाणिकपणे आणि सचोटीने केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. त्यामुळे तरुणांनी यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर कधीही करू नये. ज्या समाजामुळे आपण मोठे झालो आहोत त्या समाजालाही आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना आपण सतत मनात ठेवली पाहिजे.
कृष्णा राजाराम अष्टेकर म्हणाले, समाजातील पीडितांचे दुःख दूर करण्यासाठी केवळ पैशाने मदत न करता प्रत्यक्ष त्यांच्या कामामध्ये सहभागी झाले पाहिजे, या भावनेतूनच मी स्नेहालय या संस्थेसोबत जोडला गेलो आहे. संपत्ती आणि दया एकत्र आल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
नंदिनी जाधव म्हणाल्या, २१ व्या शतकात केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये महिलांचा बळी मोठ्या प्रमाणावर जातो. त्यामुळे अंधश्रद्धेच्या विरोधात महिलांनी एकत्र आले पाहिजे यासाठी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे आहे.
राजश्री पाटील म्हणाल्या, आपल्यावर कोणतेही संकट आले तरी आपण जर मानसिकरित्या खंबीर असू तर त्या संकटातून आपण निश्चितच बाहेर पडू शकतो, ही सकारात्मक ऊर्जा कायम मनामध्ये बाळगली पाहिजे.
डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, समाजातील चांगल्या आणि इतर व्यक्तींसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या लोकांमुळेच स्नेहालय या संस्थेचा परिवार अधिक मोठा होत आहे. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे.