fbpx

महसूल विभागाची कार्यालये सुसज्ज असणे गरजेचे-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे  -जीएसटी प्रमाणेच महसूल विभाग हा राज्याला उत्पन्न मिळवून देणारा विभाग असल्याने महसूल विभागाची कार्यालये सूसज्ज आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे, असे‌ प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.‌

जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, दीपक सोनावणे, अधिक्षक अभियंता बी. एन. बहिर, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील , पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक दीपक पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, देशाला जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. त्याप्रमाणे महसूल विभागाच्या माध्यमातून राज्याला उत्पन्न मिळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महसूल विभागाची कार्यालये अद्ययावत आणि सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असावीत यावर भर दिला होता. त्यानुसार राज्यातील अनेक कार्यालये अद्ययावत करण्यात आली. जुन्नर तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयदेखील अद्ययावत करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही इमारत उभी राहून, त्याचे लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, महसूल विभागात येणारा प्रत्येक व्यक्ती हा करदाता असतो. त्यामुळे त्याचा सेवक म्हणून कर्मचाऱ्यांनी काम करावे. त्याला चांगली वागणूक देण्यासोबतच जनतेची कामे वेगाने करावीत , असे पालकमंत्री म्हणाले.

नोंदणी महानिरीक्षक हर्डीकर म्हणाले , जुन्नर ही ऐतिहासिक भूमी आहे. येथील महसूल कार्यालयात सर्वाधिक जुन्या नोंदी आहेत. त्यामुळे हे कार्यालय अद्ययावत होणे गरजेचे होते. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन, कार्यालय कार्यान्वित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: