fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संप काळात आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याच्या आरोग्य आयुक्तांच्या सूचना

पुणे -: राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णसेवेत कुठेही बाधा येऊ नये व विनाअडथळा सार्वजनिक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करावे, अशा सूचना राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

संपाच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असणारी आरोग्य सेवा सुरु राहावी यासाठी व क्षेत्रीय यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा. विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, लेबर रूम या संवेदनशील विभागांची सेवा अविरत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. पर्यायी मनुष्यबळाबाबत आवश्यक उपाययोजना आखून कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवा बाधित होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत.

रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आपात्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात याव्यात, जेणेकरुन कुठल्याही आपात्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा अखंडित सुरु राहील. क्षेत्रिय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी नियुक्त करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आवश्यकतेनुसार दैनंदिन तत्वावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी जिल्हा शल्य चिकीत्सक स्तरावर आवश्यतेनुसार दैनंदिन तत्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

दैनंदिन तत्वावर मनुष्यबळ भरती करताना कंत्राटी सेवा लेखाशीर्षाअंतर्गत अनुदान उपलब्ध नसल्यास रुग्ण कल्याण समिती किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात यावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांची नेमणूक सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत अथवा ३१ मार्च २०२३ पर्यंत जे अगोदर होईल तोपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर दैनंदिन तत्वावर नेमेलेले मनुष्यबळ कार्यरत ठेवायचे असल्यास त्याबाबत स्वतंत्र सूचना आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणार आहेत.

सरकारी व खाजगी नर्सिंग महाविद्यायालये, वैद्यकीय महाविद्यालये, औषधनिर्माता महाविद्यालये यांच्याशी समन्वय साधून त्यांचेमार्फत आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही करावी आणि संपकाळात या महाविद्यालयांमार्फत उपलब्ध प्रशिक्षणार्थीच्या नेमणूका रुग्णालयांमध्ये कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वयकाची नेमणूक करण्यात करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कार्यरत आरोग्य मित्र यांच्या नेमणूकादेखील करता येणार आहे.

संपामध्ये सहभागी कर्मचारी, आरोग्य संस्थामध्ये उपस्थित कर्मचारी, बाधित रुग्ण यांबाबतची दैनंदिन माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून यासाठी राज्यस्तर, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्या बाबत कळविण्यात आले आहे .

Leave a Reply

%d bloggers like this: