fbpx

ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे

पुणे – वारजे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेने हॉस्पिटल उभारावे. परंतु यासाठी महापालिकेने ठेकेदारासाठी स्वतःच्या नावावर कर्ज काढायला आमचा विरोध राहील, अशी स्पष्ट भुमिका खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी मांडली.

बारामती मतदार संघातील परंतु महापालिकेच्या हद्दीतील विविध प्रश्नांवर खासदार सुळे यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, वारजे येथे महापालिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारत आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी कमी दरात चांगले उपचार मिळावेत ही आमची मागणी आहे. हे हॉस्पिटल उभारावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.  परंतु महापालिका ठेकेदार कंपनी साठी स्वतःच्या नावावर कर्ज काढत आहे, याला आमचा विरोध आहे. 

महापालिका संबंधित ठेकेदाराला आपली जागा उपलब्ध करून देत आहे. अशा परिस्थितीत ठेकेदारानेच त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारून ते चालवणे अपेक्षित आहे. महापालिकेने कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या नावे कर्ज काढणे हे चुकीचे आहे. याला आमचा विरोध राहील, असे खासदार सुळे यांनी नमूद केले. 

 महापालिकेच्या वतीने वारजे येथे दोन एकर जागेवर 350 बेड्स चे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या या हॉस्पिटलसाठी मागविण्यात आलेली 360 कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीने मंजूर केली आहे. रुरल एनहान्सर्स या कंपनीची ही निविदा आहे. सभागृह अस्तित्वात ( नगरसेवक ) असताना मागील वर्षी भाजपच्या तत्कालीन सदस्यांनी स्थायी समिती मध्ये महापालिकेने स्वतःच्या नावावर कर्ज घ्यावे व त्याला राज्य शासनाची परवानगी घ्यावी अशी उपसूचना भाजपच्या सदस्यांनी दिली होती . त्यानुसार राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर राज्य शासनाने ऑगस्ट मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर निविदा काढण्यात आली. मागील महिन्यांत या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. 

पीपीपी मधील DBFOT हे मॉडेल असतानाही पालिकेने स्वतःच्या नावावर ठेकेदार कंपनीसाठी कर्ज काढण्याच्या प्रकरणात मोठा संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांनी याला विरोध केल्याने अधिक महत्व प्राप्त झाले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: