‘कुठे तरी दिसतो आहे माणूस तोवर जाणून घे देव’ : प्रा. प्रविण दवणे
पुणे : आजच्या मार्केटिंगच्या युगामध्ये राक्षससुद्धा देवाच्या भावाने विकला जात आहे. हिंसेला आलेली प्रतिष्ठा, अनैतिकताच नैतिकता म्हणून मिरवताना आपण पाहत आहोत. कालपर्यंत जी अनैतिक आणि भ्रष्ट माणसे होती ती आज चटकन एक रांग ओलांडून ब्रेकिंग न्यूजमध्ये उजळमाथ्याने मिरवताना दिसत आहेत, अशा सामाजिक सद्यपरिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करून ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक प्रा. प्रविण दवणे यांनी ‘कुठे तरी दिसतो आहे उजेड तोवर पणती शोधून ठेव, कुठे तरी दिसतो आहे माणूस तोवर जाणून घे देव’ अशा काव्यपंक्ती उधृत करून मंगलताई शहा यांच्या कार्याविषयी समाजजाणीवा जागृत केल्या.
असंख्य एड्सग्रस्त बालकांचे जीवन ‘पालवी’च्या माध्यमातून उजळून टाकणाऱ्या मंगलताई शहा या कणखर नारीशक्तीची कथा ‘आणि ते मंगल झाले’ या पुस्तकाचे प्रकाशन आज प्रा. दवणे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. आडकर फौंडेशनतर्फे पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहा यांच्यासह महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सचिन ईटकर, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर व्यासपीठावर होते. सुरेखा शहा यांनी या पुस्तकाचे लिखाण केले आहे.
मंगलताई यांचे कार्य जिथे जिथे संवेदना आहेत तिथे तिथे पोहोचविण्याचे कार्य हे पुस्तक शब्दरूपाने नक्कीच करेल असा विश्वास व्यक्त करून प्रा. दवणे म्हणाले, कितीही माध्यमे, यंत्रयुगे येवोत उत्कट आणि सात्विक व्यक्तिंना कायमच महत्त्व राहणार आहे. समाज नेहमी प्रकाशपूजकच राहणार आहे, आज अंधाराची पूजा रोषणाईच्या आवेशात केली जात असताना पालवी संस्थेच्या कार्याचे वर्णन म्हणजे जणू ‘मांडलेल्या चौरंगावर न मावणारी देवपूजा आहे’. प्रतिज्ञा आणि नागरिकशास्त्र हा विषय ऑप्शनला टाकल्यामुळे भारताचे सामाजिक प्रश्न मोठे झाले आहेत. अशा स्थितीत मंगलताई शहा यांचे कार्य बघून जाणिवेच्या दीपज्योती उजळत ठेवाव्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘पालवी’चे कार्य म्हणजे नैतिकता घालविलेल्या समाजाचा आरसा आहे, अशा शब्दात भावना व्यक्त करून मंगलताई शहा म्हणाल्या, समाजात नैतिकता ढासळणारा प्रश्न उभाच राहू नये, पालवी सारख्या संस्थांची गरज पडू नये कारण शिक्षण, आरोग्य अशा इतरही सामाजिक क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक एचआयव्हीग्रस्त बालकाच्या मनात हा प्रश्न असतो, की ही होणारी अवहेलना, अपमान, दुर्लक्षितपण सोसणे यात आमचा दोष काय?
समाजातील विविध घटकांकडून ‘पालवी’ला मदत मिळविण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन सचिन ईटकर यांनी या प्रसंगी दिले.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, ‘पालवी’ संस्थेचे कार्य समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे पुस्तक येत्या 60 दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. आभार डिंपल घाटगे यांनी मानले.