खत खरेदी करताय आधी जात सांगा; ऑनलाईन खत खरेदीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांचे केंद्राकडे बोट
मुंबई : अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे हाल झालेले असताना आता रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी पुन्हा नाराज झाले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा तापले असून आज विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला यावरून घेरले. यावर खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणाले, सांगली जिल्ह्यात शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. यामध्ये जातीचा उल्लेख आहे हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल.