Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य, कला अकादमीचा कविवर्य केशवसुत पुरस्कार प्राचार्य डॉ. संभाजी मलघे प्रदान 

पिंपरी : पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य, कला अकादमी, तसेच कवी केशवसुत स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या कवी केशवसुत काव्य पुरस्काराने इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना सन्मानित करण्यात आले.
           कवी केशवसुत यांच्या जन्मगावी मालगुंड  (जि. रत्नागिरी) येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. मलघे यांना सन्मानित करण्यात आले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी डॉ. मलघे यांचे अभिनंदन केले. 
          पुरस्कार वितरण समारंभात बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, की समकालीन वर्तमानाला कवेत घेणारी आणि सामाजिक भान भक्कमपणे प्रकट करणारी डॉ. मलघे यांची कविता मराठी कवितेत नवे आयाम निर्माण करणारी आहे. अस्वस्थ भवताल आणि वेदनांचे चेहरे या कवितासंग्रहाची आज दखल घेतली जात आहे. आजच्या समाजातील अस्वस्थ वेदना त्यांच्या कवितेतून मुखर होत आहेत. चिंतनशील असणारी त्यांची कविता नक्कीच आशादायी आहे.
          डॉ. मलघे यांची कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, ललित, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारावर  बावीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
          पुरस्काराला उत्तर देताना डॉ. मलघे म्हणाले, की कवीवर्य केशवसुत काव्य पुरस्काराने सन्मानित केल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. नारायण सुर्वे हे कवितेचे आद्य दैवत आहेत आणि ज्या केशवसुतांनी मराठी कवितेची नवी पायवाट सुरू केली, आधुनिक कवितेचे जनक म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा महान कवीच्या नावाने हा पुरस्कार मिळणे, हे माझ्या कवितेला प्रोत्साहन देणारे आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading