कथा, काव्यातून उलगडला मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास
पुणे : डगमगली नाही कधी लेखणी मराठी साहित्यिकांना…अशी मराठी भाषेचा अभिजात दर्जा दाखविणारी कविता, चक्रधरांनी लिहिलेली चिऊ काऊची पहिली मराठी कथा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठी भाषा वाढीसाठी आणि संवर्धनासाठी केलेले महत्त्वपूर्ण कार्य, पेशव्यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न, आदी विविध कथा काव्याच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास उलगडला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कथा बाय स्नेहल बाकरे आणि झंकार स्टुडिओ पब्लिशिंग तर्फे ब्लॉक ते ब्लॉग या नवोदित लेखकांनी व्यक्त होण्यासाठी स्थापन झालेल्या मंचाखाली आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हाॅटेल आशिष प्लाझा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये इतिहास संशोधक गणेश राऊत, वक्ते श्याम भुरके यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून मराठी भाषेचा आणि मुद्रण कलेचा गौरवशाली इतिहास उलगडला. स्नेहल बाकरे, संजय डोळे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. गणेश राऊत म्हणाले, मराठी भाषा आणि महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे , हे आपण केवळ विद्यार्थ्यांना शिकवतो परंतु तो इतिहास जगला पाहिजे आणि संवर्धन केला पाहिजे हे मात्र शिकवत नाही. महापुरुषांचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा त्यांनी मराठी भाषा संस्कृती आणि महाराष्ट्र च्या विकासासाठी केलेले कार्य आपण आपल्या जीवनात उतरवले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र संस्कृती मोठी होईल .
श्याम भुरके म्हणाले ,मराठी भाषा जगभरात पसरली आहे आणि ती टिकेल याची काळजी करण्याची गरज नाही. जगात मराठी भाषा निश्चितच टिकेल परंतु मराठी माणसांनी घरामध्ये मराठी भाषा टिकेल की नाही याची काळजी केली पाहिजे. मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलेली व्यक्ती ही सर्वांगाने विकसित होते.
अभिनेते शरद तळवळकर यांच्या जीवनावर आधारित प्राध्यापक श्याम भुरके यांच्या गुदगुल्या या ऑडिओ बुकचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
सत्यजित पंगू यांनी ब्लॉग ते ब्लॉक या मंचाची संकल्पना आणि प्रकाशन हेल्प डेस्कच्या द्वारे लेखक, व्हॉईस ओव्हर कलाकार, प्रकाशक, संपादक आणि इतर महत्त्वाच्या घटकांनी एकत्र येवून प्रकाशन क्षेत्रातील कौशल्य विकास, विविध प्रकारचे मार्गदर्शन आणि नवीन तंत्र याचा जास्तीजास्त उपयोग कसा करता येईल या विषयी आपले मत व्यक्त केले.
स्मिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. सत्यजित पंगू यांनी आभार मानले.
