संगीताची बहरदार मैफिल घेऊन सायली संजीव आणि अभिनय बेर्डे पहिल्यांदाच एकत्र
सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांनी तर बॉलिवूडला धक्का दिलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच भर घालत रोमँटिक अशा ‘ये ना पुन्हा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात झाली आहे. प्रेमाला वयाची मर्यादा नसते, लहानपणी आकर्षण वाटत असलेलं प्रेम हे मोठेपणी खऱ्या प्रेमात कसं बदलत जात, आणि त्यासाठी प्रियकर, प्रेयसी कसे जोडले जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ये ना पुन्हा’. म्युझिकल चित्रपटाला मिळालेली रोमँटिक साथ ही ‘ये ना पुन्हा’ चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवेल यांत शंका नाही. ‘ये ना पुन्हा’ (Ye na punha) चित्रपटातून संगीताची बहरदार मैफिल घेऊन सायली संजीव ( Sayali Sanjeev) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) ही जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
या संगीतमय आणि रोमँटिक चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक तेजस कुलकर्णी (Director Tejas Kulkarni)यांनी पेलवली आहे. या चित्रपटात अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या सोबत समीर धर्माधिकारी, अमोल कागणे, नितीश चव्हाण, आशय कुलकर्णी झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी निर्माते लक्ष्मण कागणे, किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, सागर पाठक आणि अमोल लक्ष्मण कागणे यांनी सांभाळली आहे, तर सहनिर्माते म्हणून निनाद बत्तीन, तबरेज पटेल यांनी बाजू पाहिली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे समोर आले आहे.
या रोमँटिक आणि म्युझिकल प्रेमकहाणीला सुवर्ण पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच सायली संजीव आणि अभिनय बेर्डे यांच्यातील लव्हेबल केमिस्ट्री नेमकी कशी असेल हे पाहणं ही उत्सुकतेचे ठरेल.
