देवेंद्र फडणवीस हे जगातले दहावे आश्चर्य – खासदार संजय राऊत
मुंबई : राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा गाजलेला पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
यावरून राष्ट्रवादी-भाजपात जुंपली आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
अलीकडे त्यांची (भाजप) वक्तव्ये पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहे. जगात आधीची सात आश्चर्ये आहेत आणि दिल्लीत दोन आश्चर्य बसलेली आहेत आणि हे दहावे आश्चर्य महाराष्ट्रात बसले आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचे आपण मान्य केले होते. फडणवीस यांनी हॉटेल ब्लू सी मधील स्वत:चे वक्तव्य पाहावे.
अमित शहांसमोर सत्तेचे वाटप पन्नास-पन्नास टक्के हा त्यांचा शब्द होता. त्यांनी विश्वासघात केल्यावर आता इतर कोणी सत्ता बनवताना विश्वासघात केला म्हणून गळा काढण्यात काय अर्थ आहे, असे राऊत म्हणाले.
