Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

श्रुती बोरसे ठरली देशभक्त केशवराव जेधे करंडकाची मानकरी

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत एचपीटी कला विज्ञान महाविद्यालय नाशिकची श्रुती बोरसे ही देशभक्त केशवराव जेधे करंडकाची मानकरी ठरली. मुंबईच्या बीके बिर्ला महाविद्यालयाच्या यश पाटील याने द्वितीय तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा वृषभ चौधरी याने तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन प्रख्यात निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण माजी मंत्री उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ही स्पर्धा झाली. यावेळी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे आणि जेधे कुटुंबीय, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील. संयोजन समिती सदस्य डाॅ. शिवाजी पाचरणे, प्राध्यापक डॉ. के.डी. गारगोटे, डॉ. अमित गोगावले आणि संयोजन समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

सुधीर गाडगीळ म्हणाले, चढ्या आवाजात बोलत अलंकारीक शब्द प्रयोग करणे म्हणजे वक्तृत्व नाही. चांगले वक्तृत्व करण्यासाठी शब्दसंग्रह चांगला असला पाहिजे, शब्दाची मांडणी नेटकी असली पाहिजे आणि आवाज सामान्य असला पाहिजे. त्याचबरोबर सतर्कता आणि आत्मविश्वास देखील महत्वाचा आहे.

उल्हास पवार म्हणाले, आज समाजात संकुचित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन पिढीने स्वातंत्र्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. कमी शिकलेले लोक जेव्हा सत्तेत होते तेव्हा जातीवाद कमी होता, परंतु शिकलेले लोक सत्तेत आले तर जातिवाद वाढल्याचे लक्षात येते. समाजाचे भविष्य उज्वल करणे हे तरुणांचे काम आहे. सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी नवीन पिढीवर आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यामध्ये चैतन्य बनकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), चारुदत्त माळी (एस.के. पाटील महाविद्यालय कुरुंवाड), रुचिका चौधरी (अॅग्रीकल्चर कॉलेज लोणी), तेजस पाटील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), पराग बदिरके( यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय पुणे)  हे उत्तेजनार्थ विजेते ठरले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ७ हजार, द्वितीय क्रमांकाला ५ हजाराला, तृतीय क्रमांकाला ३ हजार आणि उत्तेजनार्थ क्रमांकाला १ हजार रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading