गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात माझ्या संपर्कात नाहीत – नाना पटोले
नागपूर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात नाहीत, त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामाच दिला आहे. प्रभारी एच के पाटील आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात राजीनामा दिल्याचा उल्लेख केला आहे.
मात्र, बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढिवसाच्या शुभेच्छा देत असून राजकीय उत्कर्ष व्हावा, त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आम्ही आज कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. विधान परिषद निवडणुकीत यश मिळवलेल्या आमदारांचा सत्कार आयोजित केला आहे. 15 तारखेला बैठक ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
आमच्या काँग्रेसमध्ये काय झालं, याची चर्चा जास्त होते. पण भाजपमध्ये काय चाललं आहे, याबद्दल कुणी काही बोलत नाही. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. पण जी लोक लोकशाहीला मानत नाही, त्यांच्याबद्दल विचारा. बाळासाहेब थोरात हे आमच्याशी काही बोलतच नाही. ते आमच्या संपर्कात नाही, असंही नाना पटोले यांनी सांगितले.
माझा त्यांच्याशी संपर्क होत नाही. मला कोणतीही गोष्ट माहिती नाही. पुण्यात सुद्धा ते आले नव्हते. दिल्ली कोण काय तक्रारी करत आहे, हे राजकारण आहे. मला त्याबद्दल काही माहिती नाही. आमच्याकडे लोकशाही आहे. काही लोकांना आयते बसून पदं हवी आहे. काही जण बोलतात आमच्याकडे, म्हणून मला काही माहिती नाही, त्यामुळे मी हो म्हणणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.
