भारतातून प्रथमच एव्हीगॅस १०० एलएल ची निर्यात
पुणे : इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी एव्हीगॅस १०० एलएल च्या पापुआ न्यू गिनीला जाणाऱ्या पहिल्या निर्यातीला (एक्सपोर्ट कन्साइनमेंट) जेएनपीटी च्या जीटीआय टर्मिनलवर शनिवारी दुपारी हिरवा झेंडा दाखविला. या कन्साइनमेंट मध्ये ८० बॅरल्समधुन भरलेला १६ किलोलिटर एव्हीगॅस ची निर्यात करण्यात आली. भारताने एव्हीगॅस ची निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यावेळी वैद्य म्हणाले की, जागतिक हवाई इंधनाच्या बाजारपेठेत दरवर्षी ५ टक्के संयुक्त वार्षिक वाढ दराने वाढण्याचा अंदाज आहे. भारतातील हवाई वाहतूकसुद्धा ७ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. या उत्पादनाच्या निर्मितीसोबत खुल्या झालेल्या संभाव्य व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी इंडियन ऑईल सज्ज आहे. उत्कृष्ट दर्जाचे निकष आणि स्पर्धात्मक किमतींमुळे इंडियन ऑईलने लक्षणीय प्रमाणात बाजारपेठेत वाटा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एव्हीगॅस १०० एलएलच्या स्वदेशातील उत्पादनामुळे भारताला आयातीवर खर्च होणाऱ्या परदेशी चलनाची बचत करण्यास मदत तर होईलच शिवाय उगवत्या वैमानिकांना प्रशिक्षण देणे हे देशांतर्गत विमानोड्डाण प्रशिक्षण संस्थांच्या दृष्टीने किफायतशीर होईल.
एव्हीगॅस १०० एलएल हे इंधन भारतात मुख्यतः फ्लाईंग ट्रेनिंग इंस्टिट्यूट्स (एफटीओ) आणि संरक्षण दलांमध्ये वापरले जाते. अगदी अलीकडेपर्यंत कित्येक दशकांपासून ते युरोपियन देशांमधून महागड्या दराने आयात केले जात असे. पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनानुसार, इंडियन ऑईलने एव्हीगॅस १०० एलएल या हवाई इंधनाचे स्वदेशी उत्पादन २६ सप्टेंबर २०२२ रोजी हिंदान येथील एअर फोर्स स्टेशन येथे सुरू केले. आता ते देशांतर्गत बाजारपेठेत व्यापकरीत्या वापरले जात आहे. सध्या एव्हीगॅस १०० एलएल चे उत्पादन हे इंडियन ऑईलच्या गुजरात येथील रिफायनरीमध्ये केले जात असून तिची वार्षिक क्षमता ५ टीमटी प्रति वर्ष एवढी आहे. इंडियन ऑईलच्या गुजरात येथील रिफायनरीमध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या एव्हीगॅस १०० एलएलमुळे भारतात तसेच परदेशात विमानोड्डाणाचे प्रशिक्षण देणे अधिक स्वस्त होईल.
दक्षिण अमेरिका, आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोपमधील देशांमध्ये एव्हीगॅसचा वापर लक्षणीय प्रमाणात केला जातो. त्यामुळे भारताबाहेरसुद्धा एव्हीगॅसची निर्यात करण्यासाठी मोठी संधी आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून भारतात उत्पादन झालेल्या एव्हीगॅसची पहिली कन्साइनमेंट या दिवशी निर्यात करण्यात आली.
