Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील संस्थेचा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनला मदतीचा हात

पुणे : पुणे व कोल्हापूर शहरांमध्ये कार्यरत असलेल्या शिर्केज् व्हेंचर्स या संस्थेने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत (सीएसआर) अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशन संस्थेला मदतीचा हात पुढे केला आहे. याचाच एक भाग म्हणून शिर्केज् व्हेंचर्स या संस्थेच्या वतीने पुढील दहा वर्षे सह्याद्री देवराईला त्यांच्या उत्पन्नातील काही वाटा आर्थिक मदत म्हणून देण्यात येईल. सदर आर्थिक मदत ही आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीला सह्याद्री देवराईला देण्यात येईल आणि ही रक्कम एका आर्थिक वर्षात रुपये १२ ते १५ लाख इतकी असेल. नुकेतच झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मदतीचा पहिला धनादेश शिर्केज् व्हेंचर्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण शिर्के यांच्या हस्ते अभिनेते सयाजी शिंदे यांना सुपूर्त करण्यात आला. यावेळी शिर्के समूहातील अमोल शिर्के, कौस्तुभ हिंगे, तेजल इंगळे व अभिषेक खरोसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याविषयी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, “पहिली बांधिलकी ही स्वत:च्या आईशी आणि दुसरी बांधलकी धरणी मातेशी असावी या भावनेतून सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या कार्याला सुरुवात झाली. आपल्या वयाइतकी झाडे प्रत्येकाने लावावीत, या उद्देशाने आम्ही नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. हे करीत असताना शिर्केज् व्हेंचर्स सारख्या संस्था आमच्याशी जोडल्या गेल्याचा आनंद आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या या ध्येयाला यामुळे आणखी बळ मिळाले आहे, असे आम्ही मानतो.”

सयाजी शिंदे यांचे काम हे राज्यातील एका भागापुरते मर्यादित नसून त्याचा भविष्यातील पिढ्यांना होणारा फायदा लक्षात घेत आम्हीही त्यांच्या सोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच शिर्केज् व्हेंचर्सच्या वतीने आम्ही हा पुढाकार घेत आहोत अशी माहिती किरण शिर्के यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading