Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरड धान्य प्रदर्शन

पुणे : 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (International Year of Millets २०२३) म्हणून पाळण्याचा भारताने मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. भारतातील भरड धान्य उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचाही क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील ‘भरड धान्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे (CMRT) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रविंद्र शिंगणापूरकर, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए.बी. नदाफ आणि आरवायके महाविद्यालय, नाशिकचे प्रा.डॉ.संजय औटी यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भरड धान्य गटात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि अन्य तत्सम धान्यांचा त्यात अंतर्भाव होतो. भरड धान्याचे कृषी विषयक, पौष्टिक आणि औषधी महत्त्व याबाबत संशोधनाला चालना देणे, माहितीवर आधारित कार्यक्रम आयोजित करणे हे या ‘भरड धान्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे. प्रा. प्रफुल्ल पवार यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भरड धान्यांचे महत्व जनमानसांपर्यंत व्यापक पोहोच करण्यासाठी प्रदर्शनाच्या कल्पनेचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमाला सोशल मीडियावर देखील #celebratemillets #republicday असे टॅग करत प्रसिद्धी देण्यात आली. प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध भागातून नाचणी, बाजरी, वरई, सावा इत्यादींचे माहिती देणारे फलक, आणि शुष्क नमुने प्रदर्शित केले गेले.

डॉ. रागी, नाशिक आणि ऍग्रोझी ऑरगॅनिक्स प्रा.लि., पुणे या दोन सहयोगी कंपन्यांनी भरड धान्यावर आधारित खाद्य पदार्थ प्रदर्शित केले होते आणि अभ्यागतांसाठी खरेदीसाठीही उपलब्ध होते. भरड धान्य प्रदर्शनाला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भरड धान्यांची लागवड कशी करावी, गहू आणि तांदूळ यांच्या तुलनेत ती पोषणाच्या दृष्टीने का श्रेष्ठ आहे, विविध रोगांना प्रतिबंध व बरे कसे करता येईल, याविषयी वनस्पतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी माहिती दिली.

भरड धान्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या समन्वयक डॉ. हेमलता कोतकर आणि प्रा. ए.बी. नदाफ यांनी २०२३ या वर्षात असे अनेक जनजागृती कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading