fbpx

महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्याच टार्गेट या पोलीस अधिकाऱ्याला देण्यात आलं; फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई : महाविकास आघाडी  सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन पोलिस आयुक्त  संजय पांडे यांना दिलेलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. एबीपी माझाच्या ‘ कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केला.

फडणवीस म्हणाले,  “मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकार राजकीय वैरानं वाढणारही नाही. पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीत मला अडकवा आणि मला जेलमध्ये टाका, असे आदेश महाविकास आघाडी सरकारमधील होते. हेदेखील सत्य आहे. पोलीस प्रशासनातील कोणालाही विचारलं, तर तेदेखील हेच सांगतील.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजही माझं त्यांच्याशी वैर नाही. पण मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरता त्यांनी बंद केलेत. माझा फोनदेखील त्यांनी घेतला नाही. पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो, ज्यांच्यासोबत सरकार चालवतो. कर्टसी म्हणून तरी, किमान फोन उचलून तुम्ही म्हणू शकता की, मला तुमच्यासोबत यायचं नाहीये. पण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे हे माझ्याकरता बंद केले. याचं मला दुःख आहे.”

शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार बजेटच्याच आधी होणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, राज्यपालांच्या पदमुक्तीसंदर्भात बोलताना ते माझ्याशी खासगीत बोलताना अनेकदा मला पदमुक्त करा असे म्हणाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज्यातील सत्तांतर आणि सत्तासंघर्ष याबाबतही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे ही तुमची एकट्याची मालमत्ता नाही, असं म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंवर फडणवीसांना निशाणा साधला. तर, भाजप-शिवसेना युती आणि शिवसेनेतील बंड याबाबत बोलताना मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केलेत, असंही देवेंद्र फडणवीस ठाकरेंना उद्देशून म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: