नवजात बालकांसाठी मानवी दूध बँक
पुणे : जागतिक पातळीवर मुदतपूर्व जन्मणाऱ्या पंधरा लाख बालकांच्या तुलनेत 1/5 बालके भारतात जन्मतात. मुदतपूर्व जन्मल्याने पाच वर्षाखालील बालकांचा देशात सर्वाधिक मृत्यू होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळेच भारतात नवजात बालकांच्या संदर्भात विशेषोपचाराची अंत्यत गरज मानली जाते. फॉर्म्युला स्तनपानाचा मानवी दुध पाजण्याशी तुलना केली जाते त्यावेळी बालकांचा अकाली मृत्यू, गंभीर संसर्ग, आणि नवजात बालकांचा रुग्णालयातील राहण्याचा कालावधी हे कमी होतात.
स्तनपान न करू शकणाऱ्या माता आणि नवजात अर्भकांनाच चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी सूर्या हॉस्पिटलने वाकडमधील सुविधेत ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरू केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते या सुविधेचे उदघाटन करण्यात आले. त्यामुळे मुदतपूर्व बालकांना मातेचे दूध मिळू शकेल आणि त्यामुळे त्यांना विविध आजारातून लवकर बरे होण्याचा मार्ग मोकळा होईल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, स्तनपानात वाढ केल्याने दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त बालकांचे प्राण वाचू शकतात. बहुतेक सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना यामुळे स्तनपानामुळे जीवदान मिळू शकेल. स्तनपानामुळे मातेला होणाऱ्या स्तनांच्या कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, टाइप 2 मधुमेह आणि हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. स्तनपान वाढविल्यास दरवर्षी 20 लाख मातांचा स्तनांच्या कर्करोगामुळे होणारा मृत्यू टाळणे शक्य होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
ह्युमन मिल्क बँकेच्या उदघाटनप्रसंगी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘ बहुतेक आजारी नवजात शिशू आणि अकाली बाळांना आयुष्याच्या पहिल्या आठवड्यात आईचे दूध मिळत नसल्याने मानवी दूध बँका त्यांच्यासाठी वरदान ठरत आहेत. त्यामुळे लहान बालकांमधील कर्करोगासह अन्य आजार रोखणे शक्य होते. त्याशिवाय मातांचे अंडाशय आणि स्तनाच्या कर्करोगापासूनही संरक्षण होते. मानवी दूध बँक सुरू करण्यासाठी सूर्या हॉस्पिटलने घेतलेला पुढाकार हा चांगला उपक्रम आहे. त्यामुळे अनेकांसाठी आशिर्वाद ठरू शकेल. त्याचा अनेक नवजात बाळांना फायदा होईल.’
निओनॅटोलॉजी अँड पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर सर्व्हिसेसचे संचालक डॉ. सचिन शहा म्हणाले, ‘ आमचे नवजात अर्भक युनिट दरवर्षी सुमारे सातशे नवजात बाळांना सेवा पुरवते. ज्यामध्ये इंट्राम्यूरल आणि एक्स्ट्रामुरल बालकांच्या जन्मांचा समावेश आहे. आमच्या रुग्णालयात प्रसूती येणाऱ्या अनेक महिलांपैकी 90 टक्के महिला या मुदतपूर्व प्रसूतीसाठी येतात. तर 60 ते 70 टक्के प्रसूती या 32 आठवड्याच्या आतच होतात. मुदतपूर्व बालकांना मातेचे स्तनपानच हे उपयुक्त ठरते. बालकांना स्तनपान करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. प्रत्येक नवजात बालकाला त्याच्या आईकडून स्तनपान मिळते की नाही याची खात्री करून घेतो. आमच्या नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) दररोज मानवी दुधाची अंदाजे तीन लिटर्सीची आवश्यकता आहे. प्रत्येक नवजात बालकांचे अतिदक्षता विभाग मानवी दूध बँकेच्या माध्यमातून सुसज्ज असला पाहिजे, असा आम्हाला विश्वास वाटतो.’
साधआरणतः प्रत्येक आई स्तनपान करू शकते. प्रसूतीनंतरचे नैराश्य, गंभीर आजारपण आणि हार्मोनल बदल यासारख्या काही अपवादात्मक परिस्थितीमुळे काही मातांना पुरेसे दूध तयार करता येत नाही. ज्या आई आपल्या बालकांना दूध पाजण्यास असमर्थ ठरतात त्यांना शिशू फॉर्म्युला दूध किंवा गाईचे दूध दिले जाते.
ह्युमन मिल्क बँकेचे महत्त्व अधोरेखित करताना सूर्या हॉस्पिटलच्या लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ. मनीषा खलाणे म्हणाल्या, ‘नर्सिंग मॉम्सने त्यांचे दूध द्यावे अशी आमची इच्छा आहे. कमी वजन असलेल्या सर्व अकाली बाळांना स्तनांच्या दुधाचा पुरवठा करणे आवश्यक आहे. आम्ही आतापर्यंत फॉर्म्युला मिल्क वापरत आहोत. जे मानवी आईच्या दुधाला पर्याय नाही. असे दूध पौष्टिक नसते आणि नवजात अर्भकांमध्ये, विशेषत: मुदतीपूर्वीच्या बाळांमध्ये काही वैद्यकीय आणि गुंतागूंत होण्याचा धोका वाढतो. दुसरीकडे, आईच्या दुधात संसर्गविरोधी पेशी, प्रतिपिंडे (प्रतिजैविके) आणि अतिरिक्त हार्मोन्स असतात.’
स्वत: च्या बाळांच्या दुधाच्या गरजा पूर्ण केल्यावर आणि मूलभूत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अतिरिक्त प्रमाणात उत्पादित झालेले दूध दात्या मातांकडून सूर्या हॉस्पिटलच्या ह्युमन मिल्क बँकेला मिळते. त्यानंतर दान केलेले दूध विशेष कंटेनरमध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे दूध पाश्चराइझ केले जाते. त्या दुधाच्या पिण्याने अन्य बालकाना संसर्ग होणार नाही ना याची खातरजमा केली जाते. डीप फ्रीझरमध्ये ते साठवले जाते. जेव्हा गरज भासते, तेव्हा गोठवलेले दूध वितळवले जाते आणि ते नवजात बालकास दिले जाते.
दरवर्षी जागतिक पातळीवर पाच वर्षांखालील मृत्यूंपैकी १३ टक्के मृत्यू रोखण्याची क्षमता स्तनपानात असते. स्तनपानाव्यतिरिक्त जन्माच्या पहिल्या तासात स्तनपानाची लवकर सुरुवात केल्याने जगातील एकूण नवजात अर्भकांपैकी २२ टक्के मृत्यू कमी होऊ शकतात.
