fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

21व्या गुरू तेगबहादुर फुटबॉल स्पर्धेत स्ट्रायकर्स एफसी संघाची विजयी सलामी 

पुणे  –   गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत स्ट्रायकर्स एफसी संघाने सडनडेथमध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स एफसी संघाचा 8-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली.

सीओईपी मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या अतितटीच्या लढतीत सुरवातीला दोन्ही संघानी तोडीस तोड खेळ केला. 24व्या मिनिटाला स्ट्रायकर्स एफसीच्या आदित्य कांबळेने सुबोध लामाने दिलेल्या पासवर अफलातून गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या शिवनेरी स्ट्रायकर्स एफसीच्या आघाडीच्या फळीने जोरदार चढाया केल्या. पण त्यात त्यांना अखेर यश आले नाही. पूर्वाधात स्ट्रायकर्स एफसी संघाने आपली आघाडी कायम ठेवली.

उत्तरार्धात मात्र, शिवनेरी स्ट्रायकर्स एफसीच्या खेळाडूंनी नवीन रणनीती आखत वेगवान खेळ केला. 52व्या मिनिटाला अजय तमांगने दिलेल्या पासवर स्मित राजने सुरेख ताबा मिळवत गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक धोरण स्वीकारले व त्यामुळे निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये स्ट्रायकर्स एफसीकडून सुबोध लामा, केदार मूलमंडकर, अंशुमन रावत यांनी तर, शिवनेरी स्ट्रायकर्स एफसी अजय तमांग, दिपक शर्मा, सुरज परिहार यांनी गोल केले. टायब्रेकरमध्ये देखील सामना 4-4 असा बरोबरीत सुटल्यामुळे सडनडेथमध्ये खेळविण्यात आला.  सडनडेथमध्ये स्ट्रायकर्स एफसीकडून वेंकट कोंडामुरी, ओंकार नरवाडे, अथर्व संदीप, विशाल कुमार यांनी गोल केले. तर शिवनेरी स्ट्रायकर्स एफसीकडून तेजपाल कडूयतला गोल मारण्यात अपयश आले.

याआधी स्पर्धेचे उदघाटन लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी इंटरनॅशनल संचालक नरेंद्र भंडारी,  वरिष्ठ सदस्य लायन आरके शहा, गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल अभय शास्त्री, रजिंदर सिंग वालिया, रानी अहलुवालिया, लायन्स क्लब पुणे कोथरूडचे अध्यक्ष रवींद्र भोसले, राजवीर सिंग घई, एलएस नारंग, इंद्रजीत सिंग चावला, जीवनीत सिंग चावला, लायन केतन शिंदे, लायन गिरीश गणात्रा   आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:

स्ट्रायकर्स एफसी: 4(आदित्य कांबळे 24मि.सुबोध लामा, केदार मूलमंडकर, अंशुमन रावत)(गोल चुकविले-: आकाश मोरे, इंदर थापा) टायब्रेकमध्ये बरोबरी वि.शिवनेरी स्ट्रायकर्स एफसी: 4(स्मित राज 52मि.अजय तमांग, दिपक शर्मा, सुरज परिहार)(गोल चुकविले:- स्मित राज, सागर जाधव); पूर्ण वेळ: 1-1; टायब्रेकमध्ये: 3-3;

स्ट्रायकर्स एफसी: 4(वेंकट कोंडामुरी, ओंकार नरवाडे, अथर्व संदीप, विशाल कुमार) सडनडेथमध्ये वि.शिवनेरी स्ट्रायकर्स एफसी: 3(राजेश पवार, हर्ष पांडे, विशाल थापा)(गोल चुकविले:-तेजपाल कडूयत).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading