Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

नवीन मराठी शाळेचे शतकोत्तरी रौप्य महोत्सव सुरू

पुणे : आम्ही मराठी भाषेत शिकलो त्यामुळे आमचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इंग्रजीतही आम्ही कमी पडलो नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुलांना मराठी भाषेत शिकवावे, असा पालकांचा दृष्टिकोन होता. त्याबाबत त्यांच्या मनात न्यूनगंड नव्हता. काही वर्षानंतर तो निर्माण झाला आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याकडे पालकांचा कल वाढला. काही मराठी शाळांची अवस्था बिकट आहे. इंग्रजी भाषेच्या शाळेत अधिक व्यक्तिमत्व विकास होईल असे पालकांना वाटते. परंतु हे वातावरण बदलेल असा विश्वास वाटतो. मराठी संस्कृती, वाड़मय, नाटक यासाठी मराठी भाषेचे शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी आणि माजी विद्यार्थी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन समारंभात आळेकर बोलत होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास अध्यक्षस्थानी होत्या.

आळेकर पुढे म्हणाले, ‘त्याकाळी प्राथमिक शिक्षण संस्थेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन मराठी शाळा होती. आम्हाला शाळेत समाजाभिमुख शिक्षण मिळाले, आमची मूस तयार झाली, संवेदनांची निर्मिती झाली. रंगमंचाचे शिक्षण मिळाले, शाळेच्या आठवणीत वय लहान होते, विकार गळून पडतात, निरागसपणा येतो आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. ‘

शाळेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रभाकर भावे, शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, डीईएसचे विश्वस्त जगदीश कदम, सदस्य प्राजक्ता प्रधान, राजश्री ठकार, रवी आचार्य, मुख्याध्यापिका कल्पना वाघ, माजी ज्येष्ठ शिक्षिका कुसुम सोहोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

साठे म्हणाल्या, ‘सर्व वर्गांमध्ये ई-लर्निंग सुविधा, कायम स्वरूपी विज्ञान प्रदर्शन, संगीत, चित्रकला, मातीकाम यासाठी सुसज्ज वर्ग, सुसज्ज संगणक कक्ष, ग्रंथालयाचे अधुनिकीकरण, इमारतीचे नूतनीकरण, सौरऊर्जा प्रकल्प, ठिबक सिंचन योजना, बगिचाचे सुशोभिकरण आदी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी समाजातील माजी विद्यार्थ्यांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करीत आहे.’

घैसास म्हणाल्या, ‘नवीन मराठी शाळेने नव्या जुन्याच्या संगमाने विद्यार्थ्यांचे संस्कारीत मन विकसित केले. मराठी शाळा संस्कृती जपली. भाषिक कौशल्याचे उपक्रम हाती घेतले. शेती विषयाचे शिक्षण दिले. आत्मनिर्भर भारतासाठी अधिकाधिक उद्योजक निर्माण व्हावेत.’

कदम म्हणाले, ‘शाळेने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता वाढीच्या योजना हाती घेतल्या आहेत. त्या नक्कीच पूर्ण होतील. मराठी माध्यमातील शाळांमध्ये पालकांचा ओढा कमी होत असताना या शाळेत प्रवेशासाठी प्रतिक्षा यादी तयार करावी लागते, ही बाब कौतुकास्पद आहे.’

भाग्यश्री हजारे यांनी सूत्रसंचालन, डॉ. साठे यांनी प्रास्ताविक, प्रिया इंदूरलकर व स्वाती यादव यांनी परिचय आणि कल्पना वाघ यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading