Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

बालरंजन केंद्राला यंदाचा ‘बाल कार्य सन्मान’ जाहीर


श्री शिवाजी कुल संस्थेचा १०५ वा वर्धापनदिन ; कुलरंग महोत्सवाचे आयोजन

पुणे :’मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०५ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे दिनांक ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी साहित्यसम्राट विजय तेंडूलकर नाटयगृह, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात यंदाचा बाल कार्य सन्मान कर्वे रस्ता भारती निवास सोसायटी येथील बालरंजन केंद्राला प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रावणी कदम यांनी दिली.

शनिवार, दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कुलरंग महोत्सवाचे उद््घाटन होणार आहे. यावेळी प्रसिद्ध साहित्यिका व लेखिका डॉ.संगीता बर्वे, प्रख्यात चित्रकार राहुल देशपांडे यांसह अनेक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात संस्थेच्या कुलवार्ता या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन देखील होणार आहे.

सहाय्यक कुलमुख्य यश गुजराथी म्हणाले, रविवार, दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाल कार्य सन्मान प्रदान समारंभ होणार आहे. पुण्यात ३५ वर्षे मुलांच्या शारिरीक, मानसिक विकासासाठी काम करणा-या बालरंजन केंद्र, भारती निवास सोसायटी, कर्वे रस्ता या संस्थेला यंदाचा बाल कार्य सन्मान देण्यात येणार असून सन्मान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे.

समितीप्रमुख सानिका काकडे म्हणाल्या, पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त), अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष व श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सेक्रेटरी अण्णा थोरात उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप आहे. बालरंजन केंद्राच्या माधुरी सहस्त्रबुद्धे व सहकारी सन्मान स्विकारणार आहेत.

दोन्ही दिवशी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. दोन दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी व श्री शिवाजी कुलाच्या आजी-माजी कुलवीरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading