विजयस्तंभ परिसरात कॅटलिस्ट फाऊंडेशन मार्फत स्वच्छता मोहीम
पुणे : कोरेगाव भिमा येथे आज कॅटलिस्ट फाऊंडेशन मार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या सह सहकार्यांनी २०५ व्या शौर्य दिनानिमित्त अभिवादन करून परिसर स्वच्छ केला.
आजच्या या स्वच्छता मोहिमेत पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्यासह भाजप शिवाजी नगर युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, संतोष भिसे, जितेंद्र गायकवाड, सुनील दैठणकर, जे. नित्यानंद, हिमांशू मुथय्या, अनिल माने आदींनी सहभाग नोंदवला.
याबाबत बोलताना कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने म्हणाले, १ जानेवारी रोजी १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विजय स्तंभ परिसराला भेट देऊन विजय स्तंभ परिसराचा इतिहास पुढे आणला. त्यावेळेपासून शौर्य दिनाचे प्रतिक म्हणून अनेक भीम अनुयायी दरवर्षी १ जानेवारीला राज्यभरातून विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. प्रतिवर्षी येथे भेट देणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत आहे. येणारा प्रत्येक जण विजय स्तंभाला फुले वाहत असतो. त्यामुळे येथे फुलांचा, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर साठतो. दुसऱ्या दिवशी हा कचरा साफ करताना प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यामुळे प्रशासनाला सहाय्य म्हणून आम्ही प्रतिवर्षी कॅटलिस्ट फाऊंडेशन मार्फत दुसऱ्या दिवशी येथे जाऊन स्वच्छ्ता मोहीम राबवतो. यावर्षी ही अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत आम्ही हा उपक्रम राबवला.
