fbpx
Sunday, May 19, 2024
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

VED MOVIE REVIEW – प्रेमात पडावे असा ‘वेड’

‘तुझे मेरी कसम’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या रितेश देशमुख आणि जिनीलिया डिसोझा या जोडीने महाराष्ट्राला ‘वेड’ लावले. महाराष्ट्राची हीच लाडकी जोडी ‘वेड’ चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटात स्क्रीन शेयर करत आहे. या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटाची निर्मिती जिनीलियाने केली आहे तर रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसला आहे.

‘वेड’ ही कथा आहे प्रेमाची, हो प्रेमाची प्रेम त्रिकोणाची नाही. सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जिनीलिया देशमुख) भोवती फिरणाऱ्या या कथेत निशा (जिया शंकर) हा महत्वाचा दुवा आहे. सत्या निशाला बघताच तिच्या प्रेमात पडतो, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळे आहे, पुढे श्रावणी आणि सत्या यांचे लग्न होते. पण त्यांच्या नात्यात नवरा – बायकोसारखे काहीच नाही. सत्या निशाच्या आठवणीत दारूच्या आहारी गेलेला आहे. निशा सत्याला पुन्हा मिळणार का? श्रावणी सत्याला आपल्या प्रेमाची जाणीव करून देणार का? अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि कुणाच ‘वेड’ प्रेम जिंकणार हे जाणून घेण्यासाठी ‘वेड’ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.

‘वेड’ मध्ये रितेश – जिनीलिया सह जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. रितेश देशमुख दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांमध्ये यशस्वी झाला आहे. जिया शंकर, शुभंकर तावडेच्या व्यक्तिरेखा लक्षात राहणाऱ्या आहेत, मराठीत पदार्पण करणारी जिनीलिया देशमुख श्रावणीच्या भूमिकेत आपली छाप सोडून जाते. सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी यांनी कॅमिओ मध्ये धमाल आणली आहे.

अजय – अतुलच्या संगीताने महाराष्ट्राला ‘वेड’ का लावले आहे? याचे उत्तर पुन्हा एकदा या चित्रपटातून मिळाले आहे. ‘वेड तुझा’, ‘बेसुरी’ या गाण्यांनी रसिकांना ‘वेड’ लावले आहेच, याशिवाय सलमान खानची विशेष भूमिका असलेले ‘वेड लावलंय’ तसंच ‘सुख कळले; हे गाणेही लक्षवेधी झाले आहे.

‘वेड’ हा साउथच्या ‘मजली’ चा रिमेक आहे, दिग्दर्शक म्हणून रितेश चित्रपटातला मराठी तडका देण्याबरोबरच आपले वेगळेपण दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. डिओपी भूषणकुमार जैनच्या कॅमेऱ्यातून दिसणार ‘वेड’ चित्रपट प्रेक्षकांनी त्याच्या प्रेमात पडावे असा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रितेश – जिनीलिया या ऑफ स्क्रीन जोडीच्या ऑन स्क्रीन केमेस्ट्री साठी ‘वेड’ बघायला हवा.

चित्रपट – वेड

दिग्दर्शक – रितेश विलासराव देशमुख

निर्मिती – मुंबई फिल्म कंपनी

निर्माती – जिनीलिया देशमुख

संगीत – अजय – अतुल

डिओपी – भूषणकुमार जैन

कलाकार – रितेश देशमुख, जिनीलिया देशमुख, जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी

रेटिंग – ****

– भूपाल पंडित

pbhupal358@gmail.com

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading