भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; अतिदक्षता विभागात उपचार सुरू
पुणे : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या गाडीला पहाटे पाचच्या सुमारास दिल्ली-डेहराडून महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर गाडीला आग लागली असून गाडीचा अगदी कोळसा झाला. सुदैवाने ऋषभ पंत या अपघातात थोडक्यात बकचावला असून त्याच्यावर डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पंतला गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा आज सकाळी दिल्लीहून उत्तराखंडमधील त्याच्या गावी जात होता. मात्र सकाळी पाचच्या सुमारास गाडी चालवताना त्याला डुलकी लागली व त्याची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली आणि गाडीला आग लागली. अपघात झाला तेव्हा पंत एकटाच गाडीमध्ये होता. अपघात झाल्यावर बाहेर पाडण्यासाठी त्याने कारची खिडकी तोडली व तो बाहेर पडला. अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना पंत यांच्या उपचारासाठी सर्व व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच गरज भासल्यास एअर अॅम्ब्युलन्स देण्यासही त्यांनी सांगितले आहे.
