fbpx

कवी, गझलकारांनी चिंतनशीलता वृद्धिंगत करावी : भारत सासणे

पुणे : गझल, कवितेच्या प्रांतात यश संपादन करण्यासाठी प्रसिद्धीच्या मागे न लागता नम्रपणे साधना, उपासना करावी, चिंतनशीलता वृद्धिंगत करावी. मनन-चिंतन वाढविल्यास त्यातून गझलकाराला शब्द सापडतात, शब्दांच्या पलिकडे अर्थ गवसतो आणि अर्थापलिकडेही आशय सापडतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी केले. आंतरिक प्रयत्नाने गुणवत्ता वाढते त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो, असेही त्यांनी नमूद केले.
मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे आज (दि. 29 डिसेंबर) भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री, गझलकार आणि शायर निरुपमा महाजन यांना सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, भाऊसाहेब पाटणकर यांचे नात जावई किरण यज्ञोपवीत, ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
भारत सासणे पुढे म्हणाले, कविता आणि भाग्यदेवता सहजासहजी प्रसन्न होत नाही. तिची उपसाना केल्यावर ती प्रसन्न होते. गांभीर्याने कवितावृत्ती जपणारे कवी टिकतात कारण ते साधना करतात. गझल सहजासहजी गझलकाराच्या हाती लागत नाही, लागलीच तर पटकन विश्वास बसत नाही कारण गझलकाराला जे सांगायचे असते ते निसरडे असते. दोन ओळींमध्ये, दोन शब्दांमध्ये आशय व्यक्त करण्याची ती प्रक्रिया असते. सांगता-सांगता व्यक्त होणे आणि व्यक्त होता-होता सांगणे हे तंत्र गझलकाराला आत्मसात होणे महत्त्वाचे असते.
किरण यज्ञोपवीत म्हणाले, भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझलांमध्ये तत्त्वचिंतनाची बैठक दिसून येते. त्यांनी आपल्या गझलांमधून आशयाचा, समृद्ध भाषेचा वापर केलेला दिसतो. भाऊसाहेब यांना तत्वविचारांचे आणि ते मांडण्याचे कौशल्य साधले होते. दृष्टी गेल्यानंतर त्यांच्या जीवनात आलेल्या अंध:कारातून गतकाळाच्या स्मृतींमध्ये रमल्यानंतर त्यांना काव्य स्फुरत गेले आणि त्यांची काव्यप्रतिभा बहरून आली.
सत्काराला उत्तर देताना निरुपमा महाजन म्हणाल्या, कविता स्फुरली, निर्माण झाली पण त्या काव्याला आकार मिळाला तो सुहृदांमुळे. लिखाण संयत आणि लयबद्ध कसे असावे याचे मार्गदर्शन पुण्याच्या साहित्यवर्तुळातील ज्येष्ठांकडून मिळाले. लेखक-कवी यांचे स्वत:चे असे काहीच नसते. सृष्टीकर्त्याकडून मिळालेले रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे ते एक माध्यम असतात.
भूषण कटककर आणि प्रभा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. रगंत संगत प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती आणि भाऊसाहेब पाटणकर यांच्या विषयीच्या आठवणींना ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात उजाळा दिला. सन्मानपत्राचे वाचन तनुजा चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन अपर्णा डोळे यांनी केले तर आभार प्राजक्ता वेदपाठक यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: