fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा संशोधक विद्यार्थ्यांकडून विद्यापीठामध्ये निषेध

पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे संशोधक विद्यार्थ्यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आज निषेध व्यक्त केला. काल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या संशोधन फेलोशिप विषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशीप एक प्रकारे पैशांची उधळपट्टी आहे. हे “साले पीएचडी वाले” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केले, या वक्तव्याचा महाराष्ट्रभर संशोधक विद्यार्थी निषेध व्यक्त करत आहेत.

छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते मानले जातात पण त्यांनीच ओबीसी विद्यार्थ्यांना दिलेल्या फेलोशिप बद्दल अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्व समाजातून याचा निषेध होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसोबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये पोस्टर दाखवून सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त केला. देशाच्या व राष्ट्राच्या विकासामध्ये संशोधक विद्यार्थ्यांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, संशोधकामुळे नवनिर्मिती होते व देशाच्या प्रगतीला चालना मिळते त्यामुळे संशोधकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संशोधकांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी खूप मोठी चूक केली आहे, त्यांनी सर्व संशोधकांची माफी मागावी असे मत पश्चिम महाराष्ट्र शोधकार्य संयोजक अंबादास मेव्हणकर यांनी व्यक्त केले.

संशोधन करणे म्हणजे काय तांदूळ चोरणे इतकं सोपं नाहीये, भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तींनी उच्च शिक्षणावर न बोललेले बरे, असे मत महाज्योती मध्ये संशोधन करत असलेल्या सौरभ मुंडे या संशोधक विद्यार्थ्याने व्यक्त केले. छगन भुजबळ यांनी संशोधक विद्यार्थ्यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर संशोधक विद्यार्थी आपणास प्रत्येक शहरांमध्ये काळे झेंडे दाखवतील. संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशीप ही नियमानुसारच दिली गेली असून राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अशा पद्धतीच्या व राज्यांमध्ये सुद्धा अनेक संस्था संशोधन व्हावे यासाठी फेलोशीप देतात. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनावर अधिक भर देण्यात आला असून राज्यांमध्ये मात्र अशा माजी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नाराजी पसरली आहे, असे मत पश्चिम महाराष्ट्र प्रदेशमंत्री आनंद भूसणर यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा व अन्य संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading