fbpx

परदेशी विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठात नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीने आयोजन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी हे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी विद्यापीठाच्याच वसतिगृहात राहतात. अनेकदा घरापासून लांब राहत असल्याने त्यांना सणांच्या कालावधीत घरी जाणे शक्य नसते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या सणांचा आनंद घेता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्राच्या माध्यमातून एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक व अधिष्ठाता डॉ.विजय खरे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, भारतीय सांस्कृतिक सबंध परिषदेचे उपविभागीय संचालक निशी बाला आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.खरे यांनी सांगितले की दरवर्षी या विद्यार्थ्यांसाठी असा छोटेखानी कार्यक्रम आपण आयोजित करतो. यावेळी काही परदेशी आणि भारतीय अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यामुळे विद्यार्थ्यांना आपण दुसऱ्या देशात आहोत याची जाणीव होऊ नये यासाठी असे कार्यक्रम घेण्यात येतात.

Leave a Reply

%d bloggers like this: