fbpx

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद शशीकुमारला वाईल्ड कार्ड प्रदान

पुणे  : पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान पार पडणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेसाठी भारताचा अव्वल मानांकित खेळाडू मुकुंद शशीकुमार याला वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देताना स्पर्धेच्या संयोजकांनी पुरुष एकेरीत भारताच्या प्रतिनिधित्वाची खात्री केली.
 
चेन्नई येथील 25 वर्षीय शशीकुमार हा या स्पर्धेतील पहिला वाईल्ड कार्ड धारक ठरला असून अत्यंत खडतर अशा एकेरी ड्रॉ मध्ये माजी ग्रँड स्लॅम विजेता मरीन चिलीच व गतवर्षीच्या उपविजेता एमिल रुसुव्होरी यांच्यासह जगातील अव्वल मधील 17 खेळाडूंचा समावेश आहे. 
 
याविषयी बोलताना स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार म्हणाले की, भारतात होणारी ही स्पर्धा असल्यामुळे भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत अत्यावश्यक अशी संधी मिळवुन देऊन त्यांना जागतिक व्यासपीठ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुकुंद शशीकुमार हा सध्याचा अव्वल मानांकित भारतीय खेळाडू असून त्याला वाईल्ड कार्ड द्वारे या स्पर्धेत प्रवेश देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मायदेशातील प्रेक्षकांसमोर तो चमकदार कामगिरी करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
 
यावेळी बोलताना अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुध्द खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे टाटा ओपन महाराष्ट्रसारख्या स्पर्धेत हीच संधी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणारी ठरेल. मुकुंद शशी कुमार हा भारतातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असून भारतीय खेळाडूंच्या सहभागाला आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन बहुमोल अनुभव मिळवण्याची संधी तो निश्चितच साधेल.
 
मुकुंद याने सप्टेंबर महिन्यात पोर्तुगाल आयटीएफ स्पर्धा जिंकताना पाच वर्षातील पहिलेच विजेतेपद मिळवले. तसेच, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या इजिप्त येथील आयटीएफ स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावले. टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद दुसऱ्यांदा मुख्य ड्रॉ मध्ये खेळत असून या स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात तो पहिल्यांदा सहभागी झाला होता. जागतिक क्रमवारीत 340व्या स्थानावर असलेल्या मुकुंदला गेल्या सत्रात पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. भारताचा युकी भांब्री हा सुद्धा पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीत खेळणार आहे. 
 
टेनिस शौकिनांना आपली तिकीटे zoonga.com वर आरक्षित करता येणार आहे. तसेच व्हाय कॉम 18 स्पोर्टस् हे या स्पर्धेचे अधिकृत प्रक्षेपण भागिदार आहेत. मुख्य स्पर्धेतील सर्व सामने स्पोर्टस् 18- 1, स्पोर्टस् 18-1 एचडी आणि जिओ सिनेमा या वर पाहता येतील. 
 
तीन वेळेची ग्रँड स्लॅम विजेता जोदी राजीव राम आणि जॉय सलीसबरी यांच्यासह अनेक अव्वल जोड्यांचा सामावेश अलयमुळे स्पर्धेतील पुरुष दुहेरी विभागातही चुरशीची स्पर्धा पहावयास मिळेल. 
 
आयएमजीच्या मालकीच्या व राईज यांच्या कडून व्यवस्थापन करण्यात आलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने भारत सरकारच्या सहकार्याने केले आहे. टाटा मोटर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या 31 डिसेंबर पासून सुरू होणार असून तर मुख्य स्पर्धा 2 ते 7 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: