‘लवकर बारे व्हा, संसदेत या’; शरद पवार यांच्याकडून खासदार गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपुस
पुणे : राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी आज पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांच्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘लवकर बारे व्हा आणि संसदेत या’, असेही पवार हे बापट यांना म्हणाले.
गिरीश बापट यांना श्वसनाचा त्रास होवू लागल्याने गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले असता; त्यांनी देखील बापट यांची भेट घेतली होती. शिवाय आज भाजप नेते किरीट सोमय्या देखील बापट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात आले होते.
शरद पवार येणार म्हणून थांबलो – किरीट सोमय्या
खासदार गिरीश बापट यांच्या भेटीसाठी अनेक राजकीय नेते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात येत आहेत. आज सकाळी भाजप नेते किरीट सोमय्या देखील बापट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात आले. त्यावेळी त्यांना शरद पवार हे देखील रुग्णालयात भेटीसाठी येणार असल्याचे कळाले. तेव्हा ‘शरद पवार येणार म्हणून मी त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात थांबलो’,असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
