fbpx

राजेंद्र प्रसन्ना यांच्या सुरेल बासुरी वादनात रसिक दंग ; पंडित आनंद भाटे व राजेंद्र कंदलगावकर या शिष्यांनी सवाईत पंडितजींना वाहिली सांगीतिक मानवंदना

पुणे  : पंडित आनंद भाटे यांचे बहारदार गायन आणि त्यानंतर सादर झालेल्या पंडित राजेंद्र प्रसन्ना यांच्या सुरेल बासुरी वादनात रसिक दंग झाले. त्यानंतर राजेंद्र कंदलगावकर यांच्या गायनाने कार्यक्रमात आणखी रंग भरले. गायन आणि वादनाच्या या सुमधुर प्रस्तुतीने पुणेकर रसिकांनी रविवारी एक सुरेल दुपार अनुभविली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा रविवारी पाचवा व शेवटचा दिवस होता. या दिवसाची सुरुवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या गायनाने झाली.

महोत्सवात आजपर्यंत मी अनेकदा संध्याकाळचे राग गायले आहे. यंदा मी खास दुपारच्या वेळ निवडली असून, यावेळेत गायनाची ही माझी पहिलीच वेळ आहे, असे सांगत त्यांनी
राग वृंदावनी सारंगने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी विलंबित बंदिश ‘तुम रब तुम साहेब ‘, द्रुत बंदिश ‘जाऊ मै तोपे बलिहारी’ सादर केले. त्यानंतर  पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ‘राम रंगी रंगले मन’ ही भक्तीरचना सादर केली. पंडितजी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय अशा ‘बाजे मुरलिया बाजे’ या गीताच्या तडफडदार सादरीकरणातून त्यांनी या दोन्ही दिग्गजांना आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रस्तुतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची उस्फूर्त दाद दिली. त्यानंतर ‘मी वसंतराव’ या चित्रपटात समाविष्ट असलेले ‘झाले युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम…’ हे मास्टर दीनानाथ आणि सवाई गंधर्व यांच्या गायकीचा प्रभाव असलेले मानापमान नाट्यातील पद सादर करत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम),  भरत कामत (तबला),  प्रसाद जोशी (पखवाज), ललित देशपांडे व आशिष रानडे (तानपुरा), माऊली टाकळकर ( टाळ) यांनी साथ केली.

त्यानंतर बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन झाले. पुण्यात बरेचदा आलोय पण आज पहिल्यांदा सवाईत प्रस्तुती करत आहे, असे सांगत त्यांनी राग अलया बिलावल’द्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यामध्ये विलंबित गत, द्रुत गत सादर करत हळूवारपणे या रागाची उकल केली. त्यानंतर पहाडी धून सादर करत, बनारसी दादराच्या प्रस्तुतीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना रवींद्र यावगल ( तबला ), राजेश व ऋषभ प्रसन्ना ( बासरी साथ ) नीता दीक्षित ( तानपुरा ) यांनी साथ केली.

तिसऱ्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन झाले.

“गुरुजींनी फार कष्ठाने हा कल्पवृक्ष जोपासला आहे. त्या कल्पवृक्षाच्या छत्रछायेत आज आम्ही सर्व कलाकार वृद्धिंगत होत आहोत. कोविडच्या मधल्या काळात ही पंढरीची वारी चुकली, पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे आणि याचा आनंद होत आहे,” असे सांगत त्यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये ‘अब तो भई तेर… ‘ ही विलंबित बंदिश, ‘ मिल जाना राम पियारे… ‘ ही तीन तालातील बंदिश त्यानंतर ‘कटे ना अब बिरहा की रात…’ ही  पिलू रागातील ठुमरी त्यांनी सादर केली. पंडित भीमसेन जोशी यांच्या ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..’ या लोकप्रिय भजन प्रस्तुतीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना उमेश पुरोहित ( हार्मोनियम), पं. रामदास पळसुले ( तबला), हर्षद डोंगरे व रवी फडके ( तानपुरा), माऊली टाकळकर ( टाळ)  यांनी साथ केली.

Leave a Reply

%d bloggers like this: