एसएफए अजिंक्यपद स्पर्धेत फुटबॉल स्पर्धेत जेएन पेटिट टेक्निकल हायस्कूल संघाला विजेतेपद
पुणे :: स्पोर्ट्स फॉर ऑल (एस एफ ए) अजिंक्यपद स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलांच्या जेएन पेटिट टेक्निकल हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत संगमवाडी येथील जेएन पेटिट टेक्निकल हायस्कूल संघाने पेनल्टी शूट आऊटमध्ये पाषाणच्या लॉयला हायस्कूलचा 4-3 असा पराभव केला. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. सामन्यात जेएन पेटिट टेक्निकल हायस्कूलकडून निओशिष भोसलेने, तर लॉयला हायस्कूलकडून नीरव साळवी यांनी प्रत्येकी एक गोल केला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर्यन्स वर्ल्ड स्कूल संघाने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल संघाचा 5-4 असा पेनल्टी शूट आऊट मध्ये पराभव करून कांस्य पदक पटकावले.
स्पोर्टस फॉर ऑल या भारतातील पहिल्या डिजिटल व मैदानावर काम करणाऱ्या संस्थेतर्फे पुण्यात १७ डिसेंबर २०२२ पर्यंत स्पोर्ट्स फॉर ऑल क्रीडास्पर्धेच्या पहिल्या सत्र पार पडणार आहे.
अशा प्रकारच्या या पहिल्याच क्रीडास्पर्धेत पुण्यातील ५०० हून अधिक शाळांमधून ८२००चा सहभाग नोंदवला असून एकूण ३ लाख रुपये पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबरच प्रशिक्षकांसाठीही आखण्यात आलेल्या खास योजनेनुसार एकूण १२ लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत याशिवाय, 14 वर्षाखालील गटात पीआयसीटी मॉडेल स्कूल संघाने मुले व मुलींच्या गटात विजतेपद पटकावले. मुलांच्या गटात अंतिम फेरीत पीआयसीटी मॉडेल स्कूल संघाने बालेवाडीच्या लॉयला हायस्कूल संघाचा 1-0 असा तर, मुलींच्या गटात पीआयसीटी मॉडेल स्कूल संघाने सीएम इंटरनॅशनल स्कूलचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
या दोन पदकांसह पीआयसीटी मॉडेल स्कूल गुण तालिकेत 46 पदांकसह आघाडीवर कायम असुन यामध्ये 10 सुवर्णपदकांचा समावेश आहे. 14वर्षांखालील मुलांच्या गटात एस एन बीपी इंटरनॅशनल स्कूल (रहाटणी) आणि मुलींच्या गटात चॅलेंजर पब्लिक स्कूल (पिंपळे सौदागर) यांनी कांस्य पदक पटकावले