‘सोलारीस करंडक’ अखिल भारतीय मानांकन अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धेचे आयोजन !!
स्पर्धेत देशातील सुमारे १५० खेळाडूंचा सहभाग !
पुणे : सोलारिस क्लब तर्फे ‘सोलारीस करंडक’ अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (१४ वर्षाखालील) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत देशातील १५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा कोथरूड येथील सोलारीस क्लब, मयुर कॉलनी १७ ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये होणार आहे.
सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे चौदावे वर्ष असून स्पर्धेत सुमारे दिडशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय मानांकन गटात होणार आहे. स्पर्धेत एकेरी व दुहेरी गटाचे सामने होणार आहेत. स्पर्धेचे आयोजन रविंद्र पांड्ये टेनिस अॅकॅडमी च्या मार्ग दर्शना खाली करण्यात आले आहे. स्पर्धेचे सामने पात्रता आणि मुख्य फेरीमध्ये होणार आहेत.
स्पर्धेचे संचालक रवींद्र पांड्ये म्हणाले की, स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, पंजाब, तेलंगणा व छत्तीसगढ या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
सोलारीस क्लबच्यावतीने नोव्हेंबर २०२२ मध्ये पुरूषांच्या वरिष्ठ स्पर्धेचे मयुर कॉलनी येथे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. या यशानंतर या मानांकित राष्ट्रीय स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे, असे भानुशाली यांनी सांगितले. स्पर्धेत देशातील १४ वयोगटातील सर्वोत्तम राष्ट्रीय मानांकन असलेले खेळाडू सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेव्दारे शिष्यवृत्ती पारितोषिके व इतरही आकर्षक बक्षीसे, प्रशस्तीपत्रक व करंडक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय स्पर्धेतील विजेत्यांना २५ गुण, उपविजेत्याला २०, उपांत्य फेरीतील खेळाडूला १५ तर, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला १० गुण मिळणार आहेत.
स्पर्धेचे साईनिंग शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळात होणार आहे, असे भानुशाली यांनी सांगितले.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्कः स्पर्धा संचालक – रवींद्र पांडे, ९८९०२१४३४३, क्लब समन्वयक राजेश सपकाळ ८३०८८३८०११.