fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना 2 जानेवारीपासून प्रारंभ

मुंबई  : महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांना 2 जानेवारी 2023 पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून सुरूवात होणार आहे. क्रीडा प्रकारानुसार राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले.महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 च्या आयोजनाबाबत आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. त्यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री  महाजन बोलत होते.

या बैठकीस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष अजित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, वित्त विभागाचे उपसचिव बी.आर.माळी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक सुहास पाटील व नवनाथ फरताडे, सहसंचालक चंद्रकांत कांबळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या तेजस्व‍िनी सावंत, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर उपस्थित होते. 

महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा राज्यात पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, मुंबई, बारामती, अमरावती, आर्मी पोस्ट इन्स्टिट्युट, पुणे तसेच पुणा क्लब इत्यादी निवडक ठिकाणी भरविण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करणे व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागामार्फत नियोजन करावे. यासाठी शासनस्तरावर पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेनिमित्त क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजनही करण्यात येणार आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां सुरळीत पार पाडण्यासाठी क्रीडा विभाग व खेळाडूंच्या दृष्टीने सोयीचा विचार करून या स्पर्धांच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल त्याठिकाणी स्थानिक पातळीवर समिती गठित करण्याबाबत सूचनाही यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या. सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुजरात मध्ये आयोजित ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय कामगिरी करून १४० पदकांसह देशात पहिला क्रमांक मिळविला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्यावतिने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात क्रीडा व युवक कल्याण मंत्री  महाजन यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading