डॉ. सायरस पूनावाला यांना गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान
पुणे : बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळ्यांतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार कोव्हिशिल्ड लसीची निर्मीती करणारे सिरम इन्स्टिटयूटचे प्रमुख डॉ.सायरस पूनावाला यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला.
सॅलिसबरी पार्क येथील डॉ. पूनावाला यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात विठ्ठल मणियार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त राजू बलकवडे आदी उपस्थित होते. महावस्त्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
डॉ. पूनावाला यांनी ट्रस्टच्या विविध शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय उपक्रमांची माहिती घेतली. तसेच ट्रस्ट तर्फे देवदासी व त्यांच्या मुलांसाठी करण्यात येत असलेल्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले. गणेश कला क्रीडा येथे झालेल्या कार्यक्रमात धार्मिक कार्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सार्वजनिक स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.